Ahilyanagar News
Ahilyanagar News

Ahilyanagar News : मोबाईल इंटरनेच्या अधिकाधिक वापरामुळे माणूस एकटा पडत चालला असून पारावर जाऊन मित्रांशी गप्पा मारणे हा प्रकार जवळपास थांबल्यात जमा आहे.

फोर जीच्या सुरुवातीपासून ही समस्या वाढण्यास सुरुवात झाली असून आज मोबाईलशिवाय राहाणे, ही कल्पनाही करणे अवघड होत चालले आहे.

मोबाईल इंटरनेट वेगवान होण्याच्या आधी फावल्या वेळेत कुणाकडे तरी जाऊन बसणे व गप्पा मारणे हा बऱ्याच व्यक्तींचा आवडता उदद्योग असायचा. ग्रामीण भागात तर दिवसभर पारावर म्हणा किंवा ग्रामपंचायतीच्या पडवीत गप्पा मारताना कुणी ना कुणी बसलेले असायचे. हॉटेल, चहाची टपरी, पान टपरी असो वा किराणा दुकान, कायम एक टोळके गप्पा मारताना दिसायचे. या गप्पा आता कुठेतरी हलवलेल्या दिसत आहेत.

गावातील पार म्हणजे आताच्या पिढीला माहिती नसले, तरी पस्तीशी-चाळीशीत असलेल्या लोकांनी पारावर जाऊन गप्पार मारलेल्या आढळेल. जिथं घरातल्या समस्यांपासून थेट देशाच्या राजकारणापर्यंत गप्पा मारल्या जातात, ते ठिकाण म्हणजे गावातील पार. याच पारावर पूर्वी गावातल्या गावातील समस्यांवर न्याय निवाडा केला जायचा. नंतर हे ठिकाणी गप्पांचे ठिकाण बनले. हे पार जवळपासू प्रत्येक गावात आढळते. हा पार आता केवळ कथेतील भाग बनत चालले आहे.

हे पार कधीपासून अस्तित्वात आले, याबद्दल कुठे पुरावा मिळत नसला, तरी हे पार म्हणजे गावातील ग्रामस्थाला व्यक्त होण्याचे एक हक्काचे ठिकाण होते. येथे आल्यानंतर गावात काय चालले, याची इत्यंभूत खबर मिळत असायची. महत्वाचे म्हणजे गावातील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवता यायची. सर्व जाती धर्माची लोकं येथे येऊन गप्पा कुटायची. हे पार म्हणजे काय? असा प्रश्न नवीन पिढील पडत असेल, तर गावाच्या महत्वाच्या मध्यवर्ती भागात एखादद्या मोठ्या झाडाभोवती दगडांनी बांधलेले गोल बांधकाम म्हणजे पार.

दिवस मावळू लागला की दमलेले पाय या पाराकडे वळू लागायचे. रात्रीच्या जेवणाच्या वेळीपर्यंत लोक या पारावर बसून गप्पा मारायचे. दिवसभर वृदद्ध मंडळी या पारावर बसून गप्पा मारायच्या तर तरूण सायंकाळी शेतावरून आल्यानंतर येथे यायचे. अनेक पुरूष मंडळी रात्रीचे जेवण झाल्यानंतरही पारावर गप्पा मारायला यायचे.

आता मात्र परिस्थिती बदलली आहे. गप्पांचा वेळ आता मोबाईलवर खर्च होऊ लागला आहे. जगातील सर्व प्रकारचे विषय आता मोबाईलच्या एका बटणावर आले आहेत. इंटरनेटचा स्पीडही वाढला आहे. मनोरंजनाची सर्व प्रकारची साधने या छोट्याशा दिसणाऱ्या मोबाईलवर उपलब्ध होऊ लागली आहेत. त्यामुळे साहजिकच मोबाईलचा वापर वाढला आहे.

एका ठिकाणी जमूनही एकत्र नाही
मोबाईलचा वापर वाढण्याचा परिणाम पारावरील गप्पांवरही झाला आहे. एका ठिकाणी जमून गप्पा मारणे कमी झाले आहे. आज पारावर जमले तरी ज्याच्या त्याच्या हातात मोबाईल दिसू लागला आहे. या पारावरील लोक एकाच ठिकाणी बसूनही एकत्र नसल्याचे चित्र दिसत आहे.

गप्पांचे क्लब सुरू करणे गरजेचे
काळ बदलला आहे. एका घरात राहूनही लोक एकमेकांशी कनेक्टेड नसतात. पूर्वी गप्पा मारण्यासाठी व वेगवेगळे खेळ खेळण्यासाठी क्लब निर्माण केले जायचे. तसे गावोगावी, शहरा-शहरात छोटे छोटे गप्पांचे क्लब सुरू करण्याची गरज आहे.