Ahilyamnagar News : गेल्या काही दिवसांपासून थंडीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे सकाळच्या वेळी लहान मुलांना शाळेसाठी बाहेर पडावे लागत असून याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होवू लागला आहे.

सकाळच्या वेळेत शाळेला जाताना लहान मुले, विद्यार्थी थंडीने कुडकुडतात, तर बाहेरगावी जाणाऱ्या मुलांनाही थंडीमुळे वेळ लागत आहे. यामुळे शाळेच्या सकाळच्या वेळा एकेक तासाने वाढवाव्यात, अशी मागणी पालकांतून जोर धरत आहे.

या थंडीचा पशुपालकांवरही परिणाम झाला असून, धारा काढून थंडीतच डेअरीला दूध घालायला जावे लागते. ऊसतोड कामगार व विटभट्टी कामगारांना पहाटेच थंडीची पर्वा न करता वीटभट्टीच्या व ऊसतोडीच्या कामासाठी जाताना लहान-लहान मुलांचे थंडीने हाल होताना दिसत आहेत.

या वाढत्या थंडीचा बाजारपेठावरही परिणाम झालेला दिसत आहे. सकाळी नऊच्या पुढेच थंडी कमी झाल्यावर व्यवहार सुरू होतात. संध्याकाळी तर बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे.

थंडीपासून वाचवण्यासाठी स्वेटर, जर्किन, स्कार्फ, कानटोप्या तसेच दुकानातून घोंगडी, ब्लॅकेटला मागणी वाढली आहे. सर्दी, तापाच्या रुग्णांत वाढ गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वाढली आहे.

यामुळे लहान मुलांमध्ये सर्दी, ताप, खोकला यासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील दवाखान्यांत उपचार घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. वाढत्या थंडीमुळे दम्याच्या रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

थंडीचा परिणाम म्हणजे लहान मुलांना लगेचच सर्दी-कफ होतो, हे वाढले तर ताप येणे, खोकला होणे यांसारखी लक्षणेही दिसू लागतात. सर्दी-तापामुळे अन्न न जाणे, चिडचिड होणे अशा तक्रारी निर्माण होतात. वेळेत ही सर्दी बरी झाली तर ठिक नाहीतर नीट झोप होत नाही, सर्दी साठून राहीली तर नीट श्वास घेता येत नाही आणि मग मुलं अस्वस्थ होतात.