Ahilyanagar news : मागील दोन ते तीन दिवसांपासून सर्वत्र थंडी वाढली असून रब्बी हंगामातील पिकांना या थंडीचा मोठा फायदा होणार असल्याने बळीराजा सुखावला आहे. थंडी गायब झाल्याने शेतकरी चिंतेत होते. थंडीअभावी शेतक-यांची रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, मका व कांदा ही पिके धोक्यात सापडली होती. अतिथंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक असून पिके जोमात येतात व रोगाचा प्रादुर्भाव देखील या थंडीत कमी जाणवतो. त्यामुळे थंडी ही पिकांसाठी पोषक ठरत आहे.
काही दिवसांपूर्वी पडलेल्या ढगाळ वातावरणामुळे फळ बागांसह फूल उत्पादकांना फटका बसला होता. जिल्ह्यातील विविध तालुक्यात पपई, मोसंबी, डाळिंब, पेरू, आंबा, यासह आदी फळ पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
मात्र, काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण पडल्याने यातील काही फळपिके कवडीमोल भावाने विकावे लागत आहे. परिणामी फळउत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. यासह फूल उत्पादकांनाही थंडीचा फटका बसत असून, फुले उमलण्याच्या प्रमाणात घट झाल्याने फूल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होऊन थंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने रब्बी हंगामातील पिके घेतलेला शेतकरी वर्ग सुखावला आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यासह परिसरात ढगाळ वातावरण निर्माण होऊन वातावरणातील थंडी कमी झाली होती.
रब्बी हंगामातील पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले थंडी पुरेशा प्रमाणात पडत नसल्याने गहू, हरभरा, कांदा, ज्वारी, मका, ऊस उत्पादन शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. मागील चार ते पाच दिवसांपासून परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे.
थंडीचा सरासरी पारा घटत आहे. गार वाऱ्यामुळे दिवसाही चांगलाच गारठा जाणवत आहे. वाढलेल्या थंडीमुळे गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा, या रब्बीच्या पिकांना चांगलाच फायदा होत आहे. प्रामुख्याने या पिकांची वाढ जोमाने होऊन त्यामधील दाणे परिपक्व होण्यासाठी मदत होईल. पिकांना ही थंडी पोषक ठरेल, थंडी अशीच राहिल्यास उत्पादन वाढीस याचा निश्चतच फायदा होईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासूनचा थंडीचा वाढता कडाका हा उगवून आलेल्या गहू पिकासाठी फायदेशीर ठरत आहे. सध्याच्या वाढत्या थंडीमुळे शेतकऱ्यांची गहू पेरणीसाठी लगबग वाढली आहे. ऊस तुटून गेलेले क्षेत्र आणि कपाशी उपटलेल्या शेतामध्ये तसेच ऊस पिकामध्ये आंतरपीक म्हणूनही शेतकऱ्यांकडून गव्हाची पेरणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.