Ahilyanagar News : श्रीलंका आणि बांगलादेशात भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, गरिबी, पेपर – लीक, संधी मिळण्यातील भेदभाव, – लोकशाहीच्या सांगाड्यात विकसित झालेली एकाधिकारशाही, विरोध व्यक्त करण्यासाठी सनदशीर मार्ग बंद होणे, अधिकार आणि सत्तेवर सामान्य लोकांचे ठोस नियंत्रण न राहणे, या प्रश्नांनी विस्फोट झाला.

भारतात अशा मुद्यांवरील अस्वस्थतेला जात आणि धर्मांची फोडणी सहजतेने दिली जाते. भारतातील ६५ कोटी तरुणाईने विवेक आणि सजगता दाखविली तरच भारताचा अराजकापासून बचाव होईल, असे मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.

१० ते १५ ऑगस्ट दरम्यान स्नेहालय संस्थेच्या नगर तालुक्यातील इसळक येथील मानसग्राम प्रकल्पात राज्यस्तरीय निवासी युवा शिबिरात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भारतातील स्फोटक सद्यस्थिती, जलवायु परिवर्तन, आशिया आणि युरेशियातील विविध युद्ध, मूलभूत प्रश्न सोडून भावनिक मुद्यांवर केंद्रित झालेले भारताचे राजकारण, राजकीय व्यवस्थेप्रमाणेच समाजाची ढासळलेली नैतिकता, या सर्व विषयांवर संवादात परखड भाष्य केले.

नेपाळ, श्रीलंका आणि आता बांगलादेशमध्ये विद्यार्थी आणि तरुणांनी रस्त्यावर येऊन, आक्रमक प्रतिक्रिया देत राज्यकर्ते बदलले. भारतदेखील ज्वालामुखीच्या तोंडावर असल्याचे निरीक्षण नोंदवले.

तसेच पुढे ते म्हणाले की, आपल्या शेजारी असलेल्या मोठ्या प्रमाणात देशात भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, गरिबी, पेपर – लीक, संधी मिळण्यातील भेदभाव, – लोकशाहीच्या सांगाड्यात विकसित झालेली एकाधिकारशाही, विरोध व्यक्त करण्यासाठी सनदशीर मार्ग बंद होणे, अधिकार आणि सत्तेवर सामान्य लोकांचे ठोस नियंत्रण न राहणे, या प्रश्नांचा विस्फोट झाला.

अन त्याचा परिणाम आपण पाहत आहोत. दरम्यान भारतात देखील अशा मुद्यांवरील अस्वस्थतेला जात आणि धर्मांची फोडणी सहजतेने दिली जाते. मात्र जर भारतातील ६५ कोटी तरुणाईने विवेक आणि सजगता दाखविली तरच भारताचा अराजकापासून बचाव होईल.

बालविवाह आणि कुटुंबवंचित बालकांच्या समस्यांवर यंदाच्या युवा प्रेरणा शिबिरातून महाराष्ट्रव्यापी प्रबोधन आणि संघटन केले जाणार आहे. स्नेहालयाने दोनदा भारत-बांगलादेश सद्भावना सायकल यात्रांचे आयोजन करून उभय देशातील नागरी समूहात संवाद वाढविला होता, त्यामुळे शिबिराच्या आरंभी बांगलादेशातील हिंसाचारात मरण पावलेल्या नागरिकांसाठी मौन संवेदना व्यक्त करण्यात आली.