Ahilyanagar News : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असले तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार बाकी आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीने अर्थ मंत्रालयासाठी आग्रह धरला आहे. तर भाजपसह शिवसेनेने महसूलसह पालकमंत्रीपदासाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातून कोणत्या आमदारांना संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने राज्यात घवघवीत यश मिळवत सरकार देखील स्थापन केले आहे. यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतली आहे.

आता ११ किंवा १२ डिसेंबरला महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला मंत्रिपद मिळावे यासाठी इच्छुकांनी आतापासून फिल्डींग लावली आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे इच्छुकांसह त्यांच्या समर्थकांचे देखील लक्ष लागले आहे.

मात्र या मंत्रिमंडळाच्या विस्तारात आपल्याला मंत्रिपद मिळावे यासाठी महायुतीतील भाजप – राष्ट्रवादी- शिवसेनेत मंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. परंतु मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच गृहखाते जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आता मंत्रिमंडळातील तिसऱ्या क्रमांकाचे खाते असलेल्या महसूल मंत्रिपदावर शिवसेनेने दावा केल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे यापूर्वी महसूल खाते भाजपाकडे होते त्यामुळे हे खाते परत आपल्याकडेच असावे यासाठी राधाकृष्ण विखे यांनीही थेट फडणवीस यांच्यामार्फत मोर्चे बांधणी केली आहे.

या निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यातून महायुतीला सर्वाधिक म्हणजे १० जागा भाजपला ४, राष्ट्रवादी (अजित पवार गट) ४ तर शिंदे गटाला २ अशा दहा जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात माजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता असताना महायुतीकडून देखील अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे, आशुतोष काळे, संग्राम जगताप हे तर दुसरीकडे भाजपकडून मोनिका राजळे, शिवाजी कर्डिले इच्छुक आहेत.

जरी असे असले तरी अजित पवार गटाला एक व भाजपला एक असे मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेने महसूल मंत्रिपदावर दावा केला असता तरी जिल्ह्यात शिवसेनेच्या दोन जागा आहेत.

त्यामुळे हे पद शिवसेना, राष्ट्रवादी की भाजपकडे जाणार हे मात्र विस्तारानंतरच स्पष्ट होणार आहे. पालकमंत्री उर्वरित पदासाठी भाजप आग्रही आहे, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष हे पालकमंत्री असतात. त्याचबरोबर इतर समित्यांच्या नियुक्तीचे अधिकार देखील पालकमंत्री यांना असतात. त्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले घेण्यासाठी पालकमंत्रिपद भाजपचे नेते, पदाधिकारी आग्रही आहेत.