Ahilyanagar News : यापूर्वी सत्तेत असलेले सरकार केवळ मोठ मोठ्या घोषणा करत होते मात्र महायुती सरकार घोषणा करणारे नव्हे तर अंमलबजावणी करणारे आहे. आम्ही जनतेसाठी काम करतो. पण ज्यांना काहीच करता आले नाही ते फक्त विरोध करतात.अशी टीका महसूलमंत्री तथा पालकमंत्री विखे पाटील यांनी विरोधकांवर केली. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या सावत्र भावांना वेळीच ओळखण्याचा सल्ला देखील पालकमंत्री विखे पाटील यांनी दिला.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार महीला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मंत्री राधाकृष्ण विखे या कार्यक्रमात दूरदृष्य प्रणालीने सहभागी झाले होते. यावेळी महीला बचत गटांना अनुदानाच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, महिलांसाठी चांगली असलेल्या ‘या’ योजनेला विरोध करणारे सावत्र भाऊ आता ओळखा. महायुती सरकारने सर्व बहीणीच्या अर्थिक उत्कर्षा करीता योजना सुरू आहे. केवळ घोषणा नाही तर अंमलबजावणी झाल्याने खात्यात पैसे जमा होत आहेत.

तसेच अद्याप अनेक महिलांचे आधार कार्ड लिंक झाले नाही त्यामुळे त्यांच्या खात्यात पैसाव जमा झाले नाहीत मात्र त्यांचे आधार कार्ड लिंक झाल्यानंतर उर्वरीत खात्यात पैसे जमा होतील असे विखे पाटील म्हणाले.

राज्य सरकारने महीलांसाठी अनेक योजना सुरू केल्या असून, बस भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत विद्यार्थ्यांनीना मोफत शिक्षण तिर्थदर्शन योजना आणि बचत गटाच्या माध्यमातून अनुदान देण्याचे काम सुरू आहे. जनतेच्या मनातील सरकार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हयात अंगणवाडी सेविका ग्रामसेवक यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे सात लाख महीलांचे अर्ज मंजूर होवू शकले. ही योजना पुढेही चालू राहाणार असल्याने योजनेचे हप्ते खात्यात जमा होतील असा विश्वास त्यांनी उपस्थित महीलांना दिला.