Ahilyanagar News : यंदा कांद्याला चांगले भाव मिळत असल्याने रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा लागवडीकडे वळले आहेत. त्यामुळे कांद्याची बियाण्यांची टंचाई भासत असून अनेकजण महागडे बियाणे खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव पैसे खर्च करावे लागत आहेत.

दुसरीकडे शेतकऱ्याने कांदा लागवड करण्यासाठी टाकलेले रोपे अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडत असल्याने आता शेतकऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. अस्मानी संकटासह वीजपंपांच्या चोऱ्यांमुळे आधीच संकटात असलेला शेतकरी वर्ग रोपे लंपास होऊ लागल्याने चिंताग्रस्त झाला आहे.

सध्या कांद्याच्या रोपांचे दर वाढले असून, पैसे देऊनही खात्रीशीर रोप मिळत नसल्याचे चित्र आहे. गेल्या हंगामात कांदा काढणी वेळी अवकाळी पाऊस झाला. त्यात निम्म्यापेक्षा अधिक कांदा खराब झाला. त्यानंतर शेतातून चांगल्या प्रतीचा शिल्लक राहिलेला कांदा चाळीत साठवणूक करून ठेवला.

मात्र, मोठ्या प्रमाणावर कांदा सडून गेला. बाजारपेठेत पडलेल्या दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. या हंगामातील लागवडीपूर्वी निसर्गाच्या कोपामुळे कांदा रोप योग्य प्रमाणात व दर्जेदार तयार झालेले नसल्यामुळे कांदा लागवड क्षेत्र घटण्याची शक्यता आहे.

तर मोठा खर्च करून अनेकांनी कांद्याची लागवड केली आहे तर काहीजण लागवड करत आहेत. मात्र सध्या होत असलेल्या वातावरणातील बदलांमुळे कांद्यावर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना या रोगांपासून कांदा पीक वाचवण्यासाठी महागडी औषधे फवारावी लागत आहेत.

कांदा लागवडीसाठी कांद्याचे महागडे बियाणे घेऊन ते शेतात रोपांसाठी टाकले होते. खते, औषधे फवारणीकरून मोठ्या मेहनतीने रोपे वाढवले. ऐन लागवडीस आलेली रोपे अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी चोरून नेले. हि घटना नाशिक जिल्ह्यातील नगरचौकी येथे घडली आहे. याप्रकरणी शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून मनमाड पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.