Ahilyanagar News : राजकारण हे गरीबातील गरीब व सर्व तालुक्यातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण सातत्याने केले. एक राजकारणाची आदर्श संस्कृती निर्माण केली हे सर्व टिकले पाहिजे.

राज्य पातळीवर विविध मंत्रिपदाची संधी मिळाली. याचा उपयोग तालुक्याच्या विकासाकरीता आपण केला. एक तालुका, एक परिवार ही संकल्पना निर्माण केली. जातीभेदाचे राजकारण करून काही लोकांनी द्वेष पसरविला.अशी टीका काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटील यांचे नाव न घेता केली.

तालुक्यातील विविध गावातील नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले की, आपण वारकरी संप्रदायाचा पाईक असून मानवता धर्म कायम जोपासला आहे. तालुक्यात अर्थव्यवस्था मजबूत आहे.

विविध बँकांमधून सुमारे आठ हजार कोटींचे डिपॉझिट आहे. आपली अर्थव्यवस्था चांगली आहे. शिक्षण व्यवस्था चांगली आहे. राजकारण हे गरिबातल्या गरीब व सर्व तालुक्यातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण सातत्याने केले.

दंगलीचे शहर असलेले संगमनेर शांतता आणि वैभवशाली शहर झाले. यामागे कष्ट आहेत. तालुक्याला हक्काचे पाणी मिळवले. निळवंडे धरण पूर्ण केले. कालवे पूर्ण केले.

त्यातून अजून समृद्धी निर्माण होईल. ही विकासाची वाटचाल जपण्यासाठी सर्वांनी आपसातील मतभेद विसरून गावाच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे.

याचबरोबर तालुक्याचे पाणी पळवले जाऊ शकते, या चिंतेच्या बाबी आहेत. पण जनतेचे प्रेम आपल्यासोबत आहे. आणि तीच मोठी ताकद असल्याने आपण लढू मात्र, आता स्थानिक नागरिकांनी आपसातील मतभेद विसरून एकत्र या, असे आवाहन माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

विधानसभेत विरोधकांनी काही खोट्या एजन्सी तयार करून खोटे व्हिडिओ टाकून बदनामी केली. आता हे षडयंत्र करणाऱ्यांना उघडे पाडणार असल्याचा इशारा देखील थोरातांनी दिला.

सत्तेचा गैरवापर करून राहाता तालुक्यात अनेक कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस केल्या गेल्या होत्या. हे सर्व थांबवण्यासाठी आपण शिर्डी मतदारसंघात जाऊन लढा दिल्याचे थोरातांनी सांगितले.