Ahilyanagar News : निळवंडे धरणाचे पाणी इथपर्यंत आणणे ही सोपी गोष्ट नव्हती. राहुरी तालुक्यातील उत्तर- पश्चिमेकडील डोंगराळ भागातील शेतकऱ्यांनी या पाण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहात मोठा संघर्ष केला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्या या प्रखर संघर्षाची नोंद घेतली. या प्रकल्पाबाबतची संपूर्ण माहिती घेतली. या कामातील अडीअडचणी समजून घेतल्या. त्यानंतर योग्य पद्धतीने सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन या कामासाठी निधी मंजूर करुन घेत हे काम मार्गी लावला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात १२५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यामुळेच आज शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली असून निळवंडे धरणाचे पाणी बळीराजाच्या वावराला लागण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
राहुरी तालुक्यातील कानडगाव, तुळापूर, निभेरे येथील तलाव आज पुर्ण क्षमतेने भरले आहेत. तिन्ही ठिकाणी जाऊन शेतकरी लाभार्थी शेतकरी बांधवांच्या आग्रहाखातर त्यांच्या सोबत जाऊन आमदार तनपुरेंनी जलपूजन केले. यावेळी ते बोलत होते.
तनपुरे म्हणाले, निळवंडे धरणक्षेत्रातील जोरदार पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. हे अतिरिक्त पाणी कालव्यांतून सोडण्यात आले. या पाण्याच्या माध्यमातून पुढील काही महिने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
या पाण्याचे पूजन करीत असताना आपल्या हक्काच्या पाण्यासाठी शेतकरी बांधवांनी केलेला संघर्ष आणि त्यासाठी केलेला पाठपुरावा आठवतो.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात १२५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळेच आज शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली असून निळवंडे धरणाचे पाणी बळीराजाच्या शेतीला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तत्कालिन जलसंपदा मंत्री जयंत पाटील, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी या कामासाठी केलेले सहकार्य, मार्गदर्शन अतिशय मोलाचे होते.