Ahilyanagar News : एक तर आपण केलेल्या, होत असलेल्या आणि होणार असलेल्या विकास कामामुळे बोलायचे कशावर? यामुळे विरोधकांकडून गोळीबार प्रकरणाच्या अडून माझी बदनामी करण्याचे उद्योग सुरू आहेत. ज्याने चुकीचे काम केले, त्याला माफी नाही. त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे.
आपण लोकप्रतिनिधी आहोत, कोणीही माझ्यासोबत फोटो काढून त्यावर जर काही टॅगलाईन टाकत असेल, तर तो जनतेचा अधिकार आहे. त्याला आपण थांबवू शकत नाही. पोलिसांच्या तपासात सत्य बाहेर येईलच.
कायदा सर्वांना सारखाच आहे. यात राजकारण आणू नये, असे मुद्दे आणून केवळ बदनामी करायची, यावर लोकांनी विचार करावा. जनतेने दिलेल्या संधीतून मी कामे केली. रस्ते, इमारती, वीज, पाणी कामे केली. काही झाली, काही सुरू आहेत, काही होणार आहेत.
अजून बरेच प्रश्न आहेत. विरोधकांनी यावर चर्चा करावी. स्पर्धा करायची तर कारखाने काढा, हजारो लोकांना रोजगार द्या, लोक तुमचे काम करतील, असा टोला लगावत दिशाभूल करून काहीही साध्य होणार नाही, यापुढे बदनामी कराल तर दावा ठोकला जाईल, असा इशारा आमदार काळे यांनी नाव न घेता कोल्हे यांना दिला आहे.
कोपरगावात गोळीबार प्रकरणातील जखमी आरोपीच्या व्हिडिओ क्लिपवरून युवा नेते विवेक कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना आमदार आशुतोष काळे बोलत होते .
दरम्यान शहरात वर्दळीच्या ठिकाणी दि. १९ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता झालेल्या गोळीबार संदर्भात पोलिसांना निवेदन देताना विवेक कोल्हे म्हणाले होती की, कोपरगावात गुंडाराज सुरू आहे.
गोळ्या झाडणाऱ्या आरोपीने गुन्हा करण्यापूर्वी आ. काळे यांचे बॉस म्हणून स्टेटस ठेवले होते. हल्ला झालेल्या युवकांनी आमदार आणि त्यांचे स्वीय सहाय्यक यांचे नाव या प्रकरणात घेतल्याचा व्हिडिओ दाखवत दुसऱ्याला गाडण्याची भाषा करणाऱ्या आमदारांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला. तसेच अवैध धंदे, आदी प्रकरणात त्यांचे निकटवर्तीय असल्याची टिका सत्ताधारी नेत्याची आणि गुंडाची जवळीक वाढल्याची टीका कोल्हे यांनी शहर पोलीस स्टेशनला निवेदन देताना केली होती.
त्यावर संतप्त प्रतिक्रिया देताना आ. काळे म्हणाले, अवैध धंदे आणि गोळीबार या प्रकरणात विरोधकांकडून केवळ राजकीय आरोप होतो, म्हणून आपल्याला हात झटकता येणार नाही.
आमदार या नात्याने आपल्याला या प्रश्नासह अवैध धंदे, वाळू तस्करी, रेशन तस्करी यात जातीने लक्ष घालावेच लागेल. गुन्हेगार कोणीही असो, चुकीला माफी नाही, कारवाई झालीच पाहिजे. आपण यात जातीने लक्ष घालणार आहे, असे ते म्हणाले.