Ahilyanagar News : विधानसभेपूर्वी अवघ्या २० दिवस अगोदर शिंदेसेनेत प्रवेश करत भावी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या साम्राज्याला सुरुंग लावणारे अमोल खताळ हे कोणी मोठे नेते नसताना देखील त्यांनी ही कामगिरी कशी केली जाणून घेऊयात.
माजी महसूलमंत्री थोरात हे राज्यातील काँग्रेसचा प्रमुख चेहरा. सत्ता आली तर मुख्यमंत्री पदाचे दावेदार, त्यामुळे या निवडणुकीत ते काँग्रेसचे स्टार प्रचारक होते. काँग्रेसच्या राज्यातील सिनीअर नेत्यांमध्ये महाराष्ट्रात यंदाच्या निवडणूकीत सर्वाधिक सभा थोरातांनीच घेतल्या.
थोरात महाविकास आघाडीचे उमेदवार होते मात्र संगमनेर मतदारसंघात उद्धव ठाकरे सेना व शरद पवार राष्ट्रवादी गटाची ताकद नगण्य होती.
त्यामुळे ४० वर्षे संगमनेरात केलेली विकासकामे व सक्षम सहकारी संस्था हेच थोरातांचे पारंपारीक भांडवल होते. मात्र लोकसभेप्रमाणेच त्यांनी विखे यांना घेरण्यासाठी रणनिती आखली पण यात स्वत:च्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाले अन राज्यात सर्वाधिक मतांनी गेली आठ पंचवार्षिक विजयी होणाऱ्या थोरातांना यंदाच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला.
अमोल खताळ यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. संगमनेर शहरात त्यांचे सेतू सेवा केंद्र आहे. यातून त्यांचा मतदारांशी संपर्क वाढला. त्यांचे बी. कॉमचे शिक्षण झाले असून कॉम्युटरमध्ये डिप्लोमा केला आहे.
संगमनेर जिल्हा निर्मितीसाठी केलेल्या आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. यासाठी त्यांनी पावणेदोन लाख नागरिकांची स्वाक्षरी मोहीम राबवली होती. यामुळे त्यांची नवमतदारांमध्ये क्रेझ दिसून आली. संजय गांधी निराधार योजनेतून त्यांचा ज्येष्ठ मतदारांशी संपर्क आला.
हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून त्यांचे अनेक वर्षांपासून काम सुरू होते. २०१७ पासून भाजपमध्ये सक्रिय आहेत. सध्या ते संगमनेर विधानसभा प्रमुख होते.
दरम्यान विधानसभेत संगमनेरमधून माजी खासदार सुजय विखे हे इच्छुक होते. तसा त्यांनी प्रचार देखील सुरु केला होता. मात्र संगमनेरची जागा शिंदे सेनेसाठी जाहीर झाली अन त्यापाठोपाठ धांदरफळ येथील घटना घडली.
या प्रकरणानंतर सुजय विखेंनी स्वत:ऐवजी त्यांचे शिलेदार अमोल खताळांना पुढे गेले. खताळ यांचा अवघ्या २० दिवस अगोदर शिंदेसेनेत प्रवेश करून विखेंनी त्यांना उमेदवारी दिली.
त्यांच्यामागे मनी, मसल व ब्रेन ही यंत्रणा उभी केली. त्यामुळे कधी नव्हे तो थोरातांविषयीची नाराजी व्यक्त करायला संगमनेरकरांना सक्षम पर्याय मिळाला अन थोरात यांच्या साम्राज्याला त्यांनी सुरुंग लावला.