Ahilyanagar News : या थंडीने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. तर हुडहुडी भरवणारी थंडी तुरीसह गहू पिकासाठी लाभदायी ठरणार आहे. मात्र, ती आणखी कमी झाल्यास ज्वारीसह नुकतेच लागवड केलेल्या भाजीपाला पिकांच्या वाढीसाठी नुकसानकारक ठरू शकते.
सध्या पडत असलेल्या थंडीमुळे रब्बीतील गहू, हरभरा, कांदा व ज्वारी आदी पिके जोमात आहेत. मात्र ही थंडी या पिकांना जरी फायदेशीर असली तरी कलिंगड, खरबूज, भाजीपाला, द्राक्षांना ही थंडी हानिकारक आहे.
थंडीमुळे या पिकांवर दवण्या, भुरी व इतर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या होतो. फवारणीचा प्रमाणात त्यामुळे खर्चवाढतो, उत्पादन अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. तसेच केळी व फुलशेतीलाही ही थंडी हानिकारक आहे.
मागील आठवड्यात असलेली कडाक्याची थंडीचे प्रमाण गत दोन दिवसांपासून कमी झाले आहे व ढगाळ वातारण झाले आहे थंडी गहू, हरभरा, कांदा व ज्वारी या पिकांच्या वाढीसाठी पोषक असते मात्र जास्त थंडीने देखील या पिकांना धोका पोहोचू शकतो.
मात्र सध्या या पिकांना पोषक वातावरण तयार झाल्याने त्यांची वाढ जोमात सुरू आहे. तर दुसरीकडे ढगाळ वातारण असल्याने रोगराई वाढू शकते त्यामुळे पिकांवर मावा, करपा, तुडतुडे यासारखे विविध किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. पर्यायाने यासाठी शेतकऱ्यांना अनेक महागडे औषधे फवारावी लागत असल्याने खर्च वाढला आहे.
यंदा अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अद्याप काळ्या व उच्च प्रतीच्या जमिनींना वाफसा नाही. तसेच खरीप पिकांची काढणी व ऊस तोडणी लांबल्याने देखील यावेळी गहू, हरभरा यांच्या पेरणी व लागवडीला उशीर झाला आहे. खरीप पिकांची काढणी व वाफसा मिळाल्यानंतर लागवडी व पेरणी करून घेतली आहे. अजूनही काही ठिकाणी ज्वारी, गहू, हरभरा, कांद्याची लागवड सुरु आहे.
गेल्या आठवड्यापासून कडक थंडीला सुरवात झाली आहे. या चार ही पिकांना जेवढी थंडी तेवढी त्यांची वाढ जोमात होते. यंदा ज्वारीचे क्षेत्र वाढविण्यात आले आहे. त्यानुसार पेरणी होत आहे. पावसाने ओढ दिल्याने खरिपातील तूर संकटात सापडली होती. मात्र, नंतर पडलेल्या पावसाने तूर तग धरली असून सध्या शेंगा अवस्थेत आहे.
तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, जवस या पिकांची पेरणी सुरू आहे. गेल्या काही दिवसात तापमानाचा पारा खुपच खाली आला आहे.त्यामुळे थंडी वाढली आहे. वाढलेली ही थंडी तुरीसह गहू पिकाला वरदान ठरणार आहे.वाढती थंडी तूर पिकावरील किडीसाठी मारक ठरणार आहे.