Ahilyanagar : सध्या मे महिन्यात लग्नसराईची धामधूम जोरात सुरु असल्याने बाहेरगावी जाण्या साठी प्रवाशांनी एसटी बसला पसंती दिली आहे, त्यातच बसच्या अपुऱ्या संख्येमुळे प्रवाशांची एकच झुंबड उडत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
मे महिन्यात शाळांच्या सुट्टयांबरोबरच लग्न सराई सुरु असल्याने प्रवासी संख्या वाढली आहे. तप्त उन्हाळा त्यातच अचानक सुरु होणारा अवकाळी पाऊस यामुळे प्रवाशांनी सुरक्षित साधन म्हणून एसटीचा पर्याय स्विकारला आहे.
त्यातच महाराष्ट्र सरकारने महिलांना अर्धे तिकिट दरात सवलत दिल्याने बसस्थानकावर महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे. सर्व मार्गावर धावणाऱ्या बस हाऊसफुल्ल होत आहेत. नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह उन्हाळी सुट्टया व नात्यागोत्यातील लग्न समारंभाला हजेरी लावण्यासाठी बसेसने प्रवास करावा लागत असल्याने बसवर प्रवाशांचा अतिरिक्त ताण पडत आहे.
बस मध्ये जागा मिळत नसल्याने लांबपल्ल्याचा प्रवास करण्यासाठी अनेक प्रवासी खासगी बस, प्रवासी वाहनांना पसंती देत आहेत.
ट्रॅव्हल्सला गर्दी वाढल्याने त्यांनी प्रति तिकिटामागे १०० रुपयांनी भाडेवाढ केली आहे. सद्यःस्थितीत उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून तापमान ४० अंशावर जाऊन पोहचले आहे.
लग्नसराईमुळे बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढतच आहे. परिणामी एसटी बस हाउसफुल्ल प्रवाशांनी धावत आहेत. प्रत्येक बसमध्ये प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.
तसेच खासगी वाहनोनेही गाव जवळ करण्याचा प्रयत्न नागरिक करत आहेत. एसटीच्या प्रवासात अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मोफत प्रवास योजना सुरु केली असून महिलांनासरसकट ५० टक्के सवलत लागू केली असल्याने एसटीच्या प्रवासी संख्येत अधिच वाढ झाली होती, त्यात उन्हाळी सुट्टया व लग्न सराईची भर पडली आहे. एसटीच्या प्रवासाला सवलतधारक प्रवाशांकडून प्राधान्य दिले जात आहे.
परंतु पूर्वीच्याच जुन्या गाड्यांतून प्रवाशांची वाहतूक महामंडळाकडून केली जात आहे. बस स्थानकांवर मुलभूत सुविधांची वाणवा असल्याचे दिसत आहे.