Ahilyanagar News : काही तासानंतर नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे . नवीन वर्षाच्या स्वागताला सर्वजण तयार झाले आहेत मात्र त्यापूर्वी सरत्या वर्षात आपण काय गमावले अन काय कमवले यावर नगर-मनमाड रस्त्याची दुरवस्था, विधानसभेत शिवाजी कर्डिले यांचा विजय, बिबट्यांचे हल्ले, वकील दाम्पत्याची हत्या, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्याविरुद्ध गुन्हा, गुहा येथील धार्मिक जागेच्या वादावरून दोन समाजांत झालेले वाद वर्ष २०२४ मध्ये चांगलेच गाजले.

जिल्ह्यातील एक प्रमुख व राहुरी शहरातून जाणारा नगर-मनमाड राज्य महामार्ग अत्यंत निकृष्ट झाल्याने गेल्या वर्षभरामध्ये या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू होती.या अपघातामध्ये अनेकांचे बळी गेले असून, अनेकांना कायमचे अपंगत्व आले.

यामध्ये अनेकांना आपला जीवदेखील गमवावा लागला आहे. या रस्त्याच्या कामावरून व कमिशनवरून नेतेमंडळीमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. तरीही हा रस्ता पूर्ण झाला नाही. यासाठी अनेक सामाजिक संघटनांनी एकत्र येत वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने देखील केली.

राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील वेदिका ढगे ही तीनवर्षीय बालिका तिच्या वडिलांसोबत चारा आणण्यासाठी शेतामध्ये गेली असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने बालिकेवर हल्ला केला, यामध्ये बालिका जागीच ठार आली. तसेच बिबट्याने तालुक्यामध्ये धुमाकूळ घालत अनेक शेतकरी तसेच पशुधनावर हल्ला केला. यामध्ये अनेक शेतकरी जखमी झाले, तर पशुधन ठार आले.

राहुरी तालुक्यातील एका महिलेने श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्याविरोधात राहूरी पोलिस ठाण्यामध्ये अत्याचाराचा गुन्हा दाखल केल्याने जिल्ह्यासह राज्यांमध्ये राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती.

यानंतर माजी आमदार मुरकुटे यांना राहुरी पोलिसांनी रात्रीच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.त्यानंतर त्यांना काही काळानंतर या प्रकरणात जमीन मिळाला.

राहुरी विद्यापीठामध्ये कुलसचिवाच्या निवडीवरून चांगलाच कलगीतुरा रंगला होता. तत्कालीन प्रभारी कुलसचिव विठ्ठल शिर्के यांना कुलगुरू पाटील यांनी पदमुक्त करून त्यांच्या जागेवर राज्य शासनाचे महसूल विभागाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांची नियुक्ती केली होती.

त्यानंतर आनंदकर यांना कार्यमुक्त केले. त्यांच्या जागेवर डॉ. मुकुंद शिंदे यांना सचिवपदाचा कार्यभार दिला.यामुळे विद्यापीठ प्रशासनामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या.

राज्यात गाजलेल्या मनोरी येथील आढाव वकील दाम्पत्याच्या खंडणीसाठी दुहेरी हत्याकांड झाले. हत्याकांडामधील आरोपींना २४ तासांच्या आत राहुरी पोलिसांनी गजाआड केले. उंबरे येथील स्मशानभूमीतील विहिरीतून वकील दाम्पत्याचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले होते.

राहूरी तालुक्यातील गुहा येथील वादग्रस्त जमिनीच्या वादावरून दोन समाजांमध्ये तेड निर्माण झाली होती. यावरून गुहा गावामध्ये व तालुक्यात सामाजिक सलोखा बिघडला होता.

मात्र प्रशासनामुळे हा वाद कायदेशीर असल्याने दोन्ही समाजांना विश्वासात घेऊन न्यायालय जो निर्णय देईल, तो सर्वांनी मान्य करावा, असे आवाहन केले होते. मात्र त्यानंतर वादग्रस्त जागेवर जाऊन मूर्ती बसविल्याने तणाव निर्माण झाला होता.

काही दिवसांपूर्वी लाला शेठ बिहानी विद्यामंदिर प्रशालेची शैक्षणिक सहल निघाली होती. नगर-मनमाड रोडला पडलेल्या कपारीमुळे बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. यामध्ये ४५ विद्यार्थ्यांसह शिक्षक थोडक्यात बचावले. अशा विविध घटनांनी २०२४ हे वर्ष गाजले.