Ahilyanagar News : जलसंपदा मंत्री पदाची जबाबदारी असलेल्या ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचा मतदारसंघ असलेल्या राहाता तालुक्यातील चितळी येथे बिबट्याच धुमाकूळ चालूच असून रविवारी तीन ते चार नागरिकांवर हल्ला चढविला असून, त्यात सिद्धी विकास वाघ या पंधरा वर्षे वयाच्या मुलीवर प्राणघातक हल्ला झाल्याने तिला पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील सिव्हिल दवाखान्यात दाखल केले आहे.

गेल्या सहा महिन्यापासून चितळीत बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. त्यात तीन-चार महिन्यापूर्वी एका चार वर्षे वय असलेल्या बालकाचा त्यात बळी गेल्याने यांचा धसका संपूर्ण गावाने घेतला आहे.

त्यात रानवस्ती बरोबर गावात भर वस्तीतही बिबट्या राजरोसपणे दिसून येत आहे. परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून, वनविभागा वर संताप व्यक्त होत आहे.

चितळी येथील स्टेशन ते चितळी गाव रोडवर वर्दळीच्या ठिकाणी रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास एकाच वेळो लागोपाठ नितीन तनपुरे, संदीप वाघ, संभाजी तनपुरे त्याचबरोबर सिद्धी वाघ यांच्यावर हल्ला केल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे.

याच रस्त्याने गावातील शेकडो शाळकरी मुले ये-जा करत असतात. त्यामुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त न केल्यास रास्ता रोकोसह संबंधित वनविभागाच्या कार्यालयसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान सोमवारी सकाळी ग्रामसभेत झालेल्या घटनेवरुन वन विभागाविरोधात ग्रामस्थांनी तीव्र भावना व्यक्त केल्या व तातडीन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. त्यावर वन विभागाच्या अधिकार्‍यांनी या परिसरात भेट देत ३ ठिकाणी पिंजरे लावले आहेत.

सध्या केवळ राहाता तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. रोज कोणत्या तरी ठिकाणी ते हल्ला करत असून यात शेतकरी तसेच पाळीव जनावरे जखमी अथवा त्यांचा मृत्यू देखील होत आहे.

नुकताच संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी या घाटात एक युवकावर बिबट्याने हल्ला करून त्याच्या शरीराचे लचके तोडून खाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. त्यात आता एकाच दिवशी तीन चार जणांवर हल्ला केल्याने नागरिक प्रचंड घाबरले आहेत.