Ahilyanagar News : विटभट्टीवर चिखल करीत असताना चिखल करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चिखल मिक्सर मशीनमध्ये साडीचा पदर गुंतल्याने त्यात ओढले जावून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बोल्हेगाव येथील विटभट्टीवर घडली. विजया अमोल गाडे ( वय ३०, रा. बोल्हेगाव गावठाण) असे या मयत महिलेचे नाव आहे.

विजया गाडे व त्यांचे पती अमोल गाडे हे हे मुळचे निंबोडी (ता. नगर) येथील रहिवासी असून ते दोघेही बोल्हेगाव येथील बाळासाहेब वाकळे यांच्या विटभट्टीवर मजुरी करत होते. १९ डिसेंबर रोजी विटभट्टीवर काम सुरु होते.

चिखल मिक्सर मशीन हे टॅक्टरला जोडलेले होते. या मिक्सर मशीनमध्ये विटा तयार करण्यासाठी चिखल करण्यात येतो. रोजच्या प्रमाणे त्या दिवशी देखील विटा थापण्यासाठी चिखल तयार करीत होते. मिक्सरमध्ये चिखल केला मात्र काही चिखल शिल्लक राहिला का हे पाहण्यासाठी मयत विजया या मशीनवर चढल्या. त्यावेळी टॅक्टर चालकाने मशीन बंद न करता चालूच ठेवला होता.

दरम्यान विजया यांच्या साडीचा पदर या फिरत्या रॉडमध्ये गुंतला त्यामुले त्या मिक्सर मशीनमध्ये जोरात ओढल्या जावून त्याच्या हाताला, पायाला व अंगाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

या प्रकरणी प्रारंभी तोफखाना पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर मयत विजया यांचे पती अमोल मच्छिंद्र गाडे (रा. बोल्हेगाव, गावठाण) यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी टॅक्टर चालक तेजस बाबासाहेब आंबेकर (रा. विळद, ता.नगर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.