Ahilyanagar News : सध्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यातच अनेक धरणे ओव्हरफ्लो झालेली आहेत. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी एकीकडे पाऊस कोसळत आहे धरणात पाणी मावत नसल्याने हे पाणी नदीत सोडण्यात आले आहे. असे असताना आता डोंगराळ भागातील जमीन ओलसर झाल्याने सखल भागात भूस्खलन होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मागील १० वर्षांपूर्वी माळीण दुर्घटनेनं संपूर्ण जगाला हादरवले होते. संपूर्ण डोंगराचे भूस्खलन होऊन आंबेगाव तालुक्यातील माळीण हे संपूर्ण गावच जमिनीत गाडले गेले होते. त्या घटनेच्या कटू आठवणी आजही ताज्या असतानाच आता माळीण गाव परिसरातील गावांना धोका निर्माण झाला आहे.
माळीण परिसरात असलेले पांचाळे खुर्द या गावामध्ये सात ते आठ फूट जमीन खाली गाडली गेली आहे. त्यामुळे या भागामध्ये माळीण घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आमचे पुनर्वसन करावे, अशी मागणी या गावातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागामध्ये असलेले पांचाळे खुर्द हे गाव. डिंभे धरणाच्या बॅक वॉटरजवळ हे गाव आहे. तसेच माळीण गावाच्या देखील अगदी लगत हे गाव आहे. दोन दिवसांपूर्वी या गावातील जमीन गुडघाभर खाली खचली गेली आहे.
या गावांमध्ये जवळपास ४५ हून अधिक कुटुंब वास्तव्यास आहेत. जमीन खसली गेल्याने या गावातील ग्रामस्थ भयभीत झाली आहेत. गेल्या काही दिवसांपासून या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने भूस्खलनाची मोठी भीती निर्माण झाली आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा मागणी करूनही प्रशासनाकडून कोणतेही दखल घेतली जात नाहीये.
आपत्ती व्यवस्थापनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. भविष्यात जर माळीणसारखी दुर्घटना घडली आणि आमचे संपूर्ण गाव जर भूस्खलनात गाडले गेले. तर याला जबाबदार कोण? असा सवाल येथील नागरिक विचारत आहेत.
जमीन मोठ्या प्रमाणावर खचल्याने येथील नागरिकांना जीव मोठे धरून राहावे लागत आहे. त्यामुळे आमचे लवकरात लवकर पुनर्वसन करा, अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.