Ahilyanagar News : सातासमुद्रापार आपल्या अविरत चवीचा गोडवा पोहोचविणाऱ्या राज्यातील नाशिकच्या हंगामपूर्व म्हणजेच ‘अर्ली’ द्राक्षांचा सध्या रशियासह युरोपीय देशांमध्ये डंका वाजतो आहे.

यंदा नाशिक जिल्ह्यातील बागलाण भागात ‘अर्ली’ द्राक्ष हंगामातील उत्पादकता अतिवृष्टी, वातावरणीय बदलांमुळे ५० टक्क्यांपर्यंत घटली. तुलनेत रशियामध्ये द्राक्षाला मागणी असल्याने यंदा दरात मात्र तेजी दिसून आली आहे. हंगामाच्या इतिहासात शिवार खरेदीत यंदाचे दर विक्रमी ठरले असून, सफेद द्राक्षांना १३५, तर रंगीत वाणांना १७५ रुपये प्रतिकिलो दर मिळाले आहेत.

गतवर्षीच्या तुलनेत हे दर २५ टक्के अधिक असल्याने द्राक्ष उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतातून सर्वात पहिल्यांदा द्राक्ष निर्यात ही नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव, देवळा व कळवण तालुक्यांतून होते.

रशिया व आखाती देशांमध्ये प्रामुख्याने निर्यात होते. पण, यंदा अवकाळी पावसाने उत्पादनात घट झाल्यामुळे हंगामपूर्व द्राक्षांना (अर्ली) प्रतिकिलोस १४० ते २०० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. यात लाल रंगाच्या क्रिमसनला प्रतिकिलो २०० रुपये दर मिळत असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. अन्य द्राक्षांना १४० ते १७५ रुपये दर आहेत.

या भागातील हंगामपूर्व द्राक्षे नाताळसाठी जगातील बाजारात पोहोचतात. युरोपीय देशांसह ब्रिटनमध्ये द्राक्ष निर्यातीसाठी अडचणींना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. चालू हंगामात आतापर्यंत १०० कंटेनर द्राक्ष निर्यात झाले. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण बरेच कमी आहे. एकूण उत्पादनाच्या तुलनेत १० टक्के द्राक्ष निर्यात होतात.

त्यामुळे भारतीय द्राक्षांच्या एकूण निर्यातीवर कुठलाही परिणाम होणार नाही. जहाज कंपन्यांनी पर्यायी मार्गाने ३० ते ३५ दिवसांत कंटेनर युरोपात पोहोचविण्याची तयारी दर्शविली आहे. मागील वर्षी १४ हजार ६०० कंटेनरमधून द्राक्ष निर्यात झाली होती.

सध्या आखाती देशांसह रशियात निर्यात सुरू झाली असताना लाल समुद्रातील तणावाने व्यापारी मार्गात मात्र अडचणी कायम आहेत. त्यामुळे युरोपीय बाजारात पोहोचण्यासाठी जहाजांना केप ऑफ गुड होपला वळसा घालावा लागत असल्याने अधिक दिवस लागत आहेत. आधीच्या (लाल समुद्रातील) मार्गाने द्राक्षमाल सुमारे दीड हजार डॉलर (प्रति कंटेनर) भाड्यात २० दिवसांत युरोपीय बाजारात पोहोचत असे.

आता दुसऱ्या मार्गाने माल पोहोचण्यास ३५ ते ५० दिवस लागतात; शिवाय दुप्पटीहून अधिक भाडे मोजावे लागत आहे. मागील वर्षी लाल समुद्रातील मार्ग अकस्मात बंद झाला. अन्य मार्गाने माल जाण्यात बराच वेळ वाया जात असून काही माल खराब झाला. वाढीव वाहतूक खर्चाचा भुर्दंड पडला. या नुकसानीमुळे जहाज कंपन्यांशी करार करताना निर्यातदारांनी यंदा सावध पवित्रा घेतला आहे.परिणामी बाजारात द्राक्षाला भाव मिळत आहे.