Ahilyanagar News : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला सपशेल अपयश आल्याने सध्या एकीकडे या पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडले जात आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत सपाटून आपटी खाल्लेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये ईव्हीएम पडताळणीसाठी स्पर्धाच लागल्याचे चित्र निदान जिल्ह्यात तरी सध्या दिसत आहे.

यापूर्वीच संगमनेरमधून बाळासाहेब थोरात, कोपरगावमधून संदीप वर्पे, राहुरी – पाथर्डीतून प्राजक्त तनपुरे ,पारनेर – नगरमधून राणी लंके तर कर्जत – जामखेड मधून महायुतीचे एकमेव उमेदवार राम शिंदे यांनी यांनी अर्ज दाखल केले होते.

दरम्यान ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवार शेवटचा दिवस होता. त्यामुळे काल परत चार जणांनी अर्ज दाखल केले आहेत. यात अँड.प्रताप ढाकणे, कळमकर, घोगरे, जगताप या पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे.

नगर शहर मतदार संघातील पराभूत उमेदवार अभिषेक कळमकर यांनी सावेडी, बोल्हेगाव, चाहुराणा मतदान केंद्रावरील ईव्हीएम पडताळणी अर्ज केला आहे. तसेच श्रीगोंदा मतदार संघातील पराभूत उमेदवार राहुल जगताप यांनी दोन मतदान केंद्रावरील फेर पडताळणी अर्ज केला आहे.

यामध्ये चिचोंडी पाटील, पेडगाव या मतदान केंद्राचा समावेश आहे. शिर्डी मतदार संघातील पराभूत उमेदवार प्रभावती घोगरे यांनी देखील पडताळणीसाठी अर्ज केला आहे. यामध्ये साकुर आणि लोणी खुर्द या मतदान केंद्राचा समावेश आहे.

तर शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील उमेदवार प्रताप ढाकणे यांनी शिरसाटवाडी व मोहटा मतदान केंद्रावरील ईव्हीएम पडताळणी अर्ज केला आहे. यासाठी निवडणूक विभागाकडे पडताळणी शुल्क भरले आहे.

एक मतदान केंद्रासाठी ४७ हजार २०० रुपये प्रमाणे हे शुल्क भरले आहेत. दरम्यान, निकाल लागल्यानंतर ४५ दिवसानंतर पडताळणी केली जाणार आहे.