Ahilyanagar News : महाराष्ट्राचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकासमंत्री भरत गोगावले यांनी रविवारी शिर्डी येथे साईंचे दर्शन घेतले. दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी देशाचे व राज्याचे सरकार पाच वर्षे मजबूत राहील आणि जनतेच्या विकासासाठी प्रामाणिकपणे कामे केली जातील, असा आत्मविश्वास व्यक्त केला.

गोगावले म्हणाले की, मी पंधरा वर्षांपासून ३१ डिसेंबरला शिर्डीत येऊन नववर्षाचे स्वागत करत असतो; प्रत्येकवेळी आमदार म्हणून आलो परंतु यावेळी मंत्री म्हणून साईंच्या चरणी आलो. याचा मनस्वी आनंद आहे. कुठलीही अपेक्षा ठेवली नव्हती. मागच्यावेळी नावं असूनही थांबलो व श्रद्धा आणि सबुरी या बाबांच्या मंत्राचा प्रत्यय आला.

सबुरी ठेवली आणि मंत्री झालो. माझ्या हातून राज्याच्या जनतेची सेवा व विकास कामे करण्यासाठी मी बाबांना प्रार्थना केली. राजकीय घडामोडींवर बोलताना ते म्हणाले, देशाचे व महाराष्ट्राचे हे सरकार पाच वर्षे मजबूत राहील आणि जनतेच्या विकासाचे कामे आम्ही प्रामाणिकणे करू.

संजय राऊत यांच्या ‘मोदी सरकार वर्षाच्या शेवटी राहणार नाही’ या विधानावर प्रतिक्रिया देताना गोगावले म्हणाले, आजपर्यंत राऊत जे म्हणतात त्याच्या नेमके उलट घडत आले आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत. असा मिश्किल टोलाही त्यांनी लागवला.

सध्या गाजत असलेल्याबीड येथील सरपंचांच्या हत्तेचे पडसाद राज्यभर उमटले असून या घटनेचा निषेध करतो. या घटनेतील आरोपी कितीही मोठा असेल व कुठेही लपला असेल त्याचा शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा व्हावी ही आमच्या सर्वांची मागणी आहे.

महायुतीचे सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा या घटनेत संबंध आहे यावर बोलताना गोगावले म्हणाले, यासर्व गोष्टीची चर्चा मुख्यमंत्री, तसेच दोनही उपमुख्यमंत्री बसून करतील, यावर मी भाष्य करणे योग्य नाही. परंतु सुरेश धस यांची नेमकी काय मागणी आहे यासाठी त्यांच्याबरोबर मी या विषयावर बोलणार असल्याचं गोगावले यांनी सांगितलं.

साई दर्शन घेतल्यानंतर साई संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी मंत्री गोगावले यांचा साईमूर्ती व शाल देऊन सत्कार केला. गेल्या १५ वर्षांत मंत्री गोगावले यांचा साईंवरचा विश्वास व श्रद्धा कायम राहिली असून, त्यांनी साईंच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी कार्य करण्याचा निश्चय व्यक्त केला.