Mangoe News
Mangoe News

शहरातील फळ बाजारात आंब्याची आवक वाढली असून, दर अद्याप स्थिर आहे. त्यामुळे देवगड आणि रत्नागिरी येथील हापूस आंबा सध्या सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.

बाजारात सध्या स्थानिकसह कोकणातून दररोज आंब्याची आवक होत असून, आगामी आठवड्यात आंब्यांची आवक वाढण्याची शक्यता आहे.

पुढील आठवड्यात आवक वाढल्यानंतर दर सामान्यांच्या आवाक्यात येतील, असे येथील प्रमुख आंबा व्यापाऱ्यांनी सांगितले. पोषक वातावरणामुळे यंदा कोकणातील आंब्याचे उत्पादन वाढले आहे. गेले दोन वर्षे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका कोकणातील आंब्यांना बसला होता. त्यामुळे उत्पादन घटले होते.

गेल्या वर्षी मार्चमध्ये सिंधूदुर्ग, रत्नागिरी, रायगड भागातून आंबा पेट्यांची आवक होत होती. तुलनेत यंदा आवक जास्त आहे. यंदा पोषक वातावरणामुळे आंब्यांचे उत्पादन वाढले असून, गुणवत्ताही चांगली आहे. चालु मे महिन्यापासून आंब्यांची मोठी आवक होणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यानंतर दर कमी होतील.

मे महिन्यानंतर गुजरातमधील आंब्याची आवक वाढल्यावर भाव कमी होतील. आता उन्हाची तीव्रता वाढल्याने गोडीही वाढली आहे. त्याचप्रमाणे यंदा मोहर चांगला असल्याने आंब्याचे उत्पादन अधिक राहाण्याची शक्यता आहे. आंब्यासोबत कैरीही बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीला आली आहे.

शहरात फळांचा राजा म्हणजे हापूस आंब्याचे आगमन झाले आहे. सध्या आंब्याचा भाव १५० रुपये किलो व ४०० रुपये डझन आहे. रत्नागिरीतील देवगडच्या हापूस आंब्यासह कर्नाटकमधील लालबागही बाजारात दाखल झालेला आहे. आंब्याच्या सिझनला गेल्या महिन्यातच सुरुवात झाल्याने भाव स्थिर आहे. मे महिनाअखेर आंब्याची आवक वाढेल आणि त्यानंतर भाव उतरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.