Ahilyanagar News : कोणत्याही व्यक्तीला त्याच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षकाचा मोठा हात असतो, म्हणजेच आपल्या जीवनात शिक्षकांचे खूप महत्त्व असते. एक शिक्षकच असा व्यक्ती असतो जो आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवतो, ज्याच्यामुळे आपण काय योग्य आणि काय चूक हे ओळखतो.

आपल्या ज्ञानाने व्यक्ती, समाज आणि राष्ट्र घडवणारा तो शिक्षक असतो. शिक्षक हाच विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास जागवतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या जीवनात काहीतरी करून दाखवण्याची हिंमत येते आणि आपले जीवन प्रकाशाने भरून जाते.अशा या पवित्र असणाऱ्या शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना जिल्ह्यात घडली आहे .

याबाबत अधिक माहिती अशी अकोले तालुक्यात एका शिक्षण संस्थेच्या चार शिक्षकांच्या शिक्षक मान्यता त्यांच्या सेवानिवृत्तीच्या जवळपास शेवटच्या टप्प्यात मिळाल्या. त्यामुळे या गोष्टीचा आनंद साजरा करण्यासाठी शनिवारी पार्टी आयोजित केली होती .

ठरल्याप्रमाणे शनिवारी बारा वाजता शाळा सुटल्यानंतर एका हॉटेलात ही पार्टी झाली. या पार्टीत सर्व निमंत्रित हजर होते. पैकी ‘त्या’ पाचजणांनी तीन प्रकारचे बॅण्ड मनसोक्त रिचविले.

आपापल्या पदाच्या कॅटेगरीनुसार कुणी रूममध्ये, तर कुणी बाहेर बसले होते. एकापाठोपाठ एक पेग रिचवले जात होते जवळपास सर्वकाही अलबेल होते मात्र दुपारी दोनच्या दरम्यान एक मुख्याध्यापक आणि एक शिक्षक यांच्यात किरकोळ कारणावरून चांगलीच जुंपली.

हे वाद इतके विकोपाला गेले त्या शिक्षकाने मुख्याध्यापकाला थेट बिष्णोई गँगची धमकी दिली. यानंतर मात्र या मुख्याध्यापकाने न जेवताच पार्टीतून पळ काढला.

या पार्टीतील वादाने शिक्षकांची प्रतिमा मलीन झालेली आहे. त्यामुळे अशा शिक्षकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. असेच प्रकार जर सुरु राहिले तर शिक्षणाचा दर्जा घसरून सुसंस्कृत पिढी घडण्याऐवजी दारुडी पिढी तयार होईल.