Ahilyanagar News : शहरात आपले एक हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते मात्र शहरातील घरांचे भाव सर्वांनाच परवडतील असे नसतात त्यामुळे इच्छा असूनही अनेकांचे शहरात घराचे स्वप्न अधुरेच राहते. मात्र या नवीन वर्षात हे स्वप्न साकार होऊ शकते कारण सध्या बाजारात सिमेंट, विटा, स्टील अशा बांधकाम साहित्याचे दर सध्या स्थिर आहेत.

सध्या तरी बांधकाम साहित्यांचे दर स्थिर आहेत. केवळ साहित्यांचे दर वाढले म्हणून घरांचे दर वाढतात, असे फारसे होत नाही. तर जागेचे दर वाढले, मागणी वाढली की फ्लॅटचे दर वाढतात. थोड्याफार फरकाने सगळीकडे दर जवळपास सारखेच आहेत.

बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने नव्हे, तर जागांचे दर वाढल्याने घरांच्या किमतींवर परिणाम होतो, असे येथील बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, सावेडी परिसरात सर्वाधिक, तर उपनगरात त्या तुलनेने कमी दर असल्याचेही व्यावसायिक सांगतात.

सध्या मोठ्या प्रमाणात शहरात नागरिकांची संख्या वाढत आहे, त्यामुळे बांधकामाला पुन्हा वेग आला आहे. अशा स्थितीत सिमेंट, स्टील, विटांच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. मात्र, ही दरवाढ कमी-जास्त होत आहे. त्या तुलनेत सर्वच साहित्यांचे दर सध्या स्थिर आहेत. कमी-जास्त प्रमाणात साहित्यांचे जर सगळीकडे सारखेच दिसून येतात. ऑक्टोबर महिन्यात शेअर बाजारातील घसरणीचा फटका सर्वच सिमेंट कंपन्यांना बसला होता.

एक सिमेंटची गोणी ३०० ते ३३० रुपयांपर्यंत आहे. स्टीलचे दर साधारणपणे ५५ ते ५६ रुपये किलो आहेत. वाळू माफियांवर कारवाई होत असल्याने वाळूचे दर वाढले आहेत. विटांचा दर आकाराप्रमाणे ६ हजार ते ११ हजार रुपये असा एक हजार विटांसाठीचा दर आहे.

या भागात आहेत सर्वांत जास्त भाव
• अहिल्यानगर शहरात सावेडी भागात सर्वाधिक फ्लॅटचे दर आहेत.
• या भागात ५ ते ६ हजार रुपये प्रतिचौरस फूट दर, तर उपनगरात ३ ते ४ हजार रुपये प्रतिचौरस फूट दर आहेत.