Ahilyamnagar News : सडलेला, किडे पडलेला भाजीपाला, फळे, स्वयंपाक व पिण्यासाठी अळ्यामिश्रित पाण्याचा वापर यामुळे पारनेर तालुक्याच्या दुर्गम भागातील पळशी येथील शासकीय आदिवासी मुला, मुलींच्या आश्रमशाळेतील ३२६ विद्यार्थी, विद्यार्थिनींचे आरोग्य धोक्यात आले आहे .
याबाबत कोणतीही खबरदारी घेतलेली नसल्याने या आश्रमशाळेतील विद्यार्थिनींची सुरक्षा घोक्यात आली असल्याचा आरोप आमदार काशिनाथ दाते यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दघांवर चर्चा करताना केला.
ग्रामीण भागातील आदिवासी मुल व मुली शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सरकारने निवासी आश्रमशाळा सुरू केल्या आहेत. पारनेर तालुक्यातील पळशी येथे देखील आदिवासी कल्याण विभागाच्या राजूर प्रकल्पांतर्गत निवासी आश्रम शाळा सुरू केली आहे. येथे दहावीपर्यंत ३२६ मुले शिक्षण घेतात मात्र या मुलांना देण्यात येत असलेल्या सुविधा पाहिल्यास अंगाचा थरकाप उडेल.
आमदार दाते यांनी आश्रमशाळेतील गैरकारभाराचा, असुविधांचा पाढा यावेळी वाचला. आदिवासी कल्याण विभागाच्या राजूर प्रकल्पांतर्गत असणाऱ्या या आश्रमशाळेतील गैखकारांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, आदिवासी विकास विभागाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार विद्यार्थ्यांना जेवण व इतर सुविधा पुरविण्यात याव्यात अशा मागण्या आमदार दाते यांनी केल्या.
आश्रमशाळेत सलग दोन-तीन दिवस पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेकदा आंघोळीसाठी देखील पाणी मिळत नाही. पिण्यासाठी शुध्द पाणी उपलब्ध नाही. पिण्याच्या पाण्याच्या हौदात किडे आढळतात.
केळी, बटाटा, वांगी, फ्लॉवर यासह इतर भाजीपाला सडलेला असल्याचे आढळून आले आहे. भात व भाजीत अळ्या आढळणे, मुदत संपलेल्या मसाल्यांचा वापर होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी वारंवार करतात. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे आश्रम शाळेतील मुला मुलींचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तसेच दहावीची परीक्षा दोन महिन्यावर आल्या असल्या तरी अद्याप गणित व इतर विषयांचे पाठ शिकविले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे,
यामुळे आश्रम शाळेतील मुलांची गुणवत्ता ढासळली आहे.
या आश्रम शाळेच्या आवारात बाहेरचे पुरुष कामगार रहात असल्याने, आश्रम शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने मुलींच्या सुरक्षिततेचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तरी यामुळे शासनाने या आश्रम शाळेची चौकशी करून दोषर्षीच्या विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी आमदार दाते यांनी केली आहे.