Ahilyanagar News : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी शासनाने सुमारे ४६ हजार कोटी रुपये खर्च केले व बहिणींना खुश केले. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी पाच हजार कोटी रुपये खर्च केले तर बिघडणार नाही. रात्री-अपरात्री शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून शेती व्यवसाय करावा लागत आहे.

विजेची मागणी व तुटवडा यात मोठी तफावत पडत चालली आहे. त्यासाठी धोरणात्मक निर्णय महाविकास आघाडीच्या काळात घेतले होते. त्या दृष्टीने वाटचालही चालू होती. परंतु सरकार बदलल्याने विविध योजना ठप्प पडल्या. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी राज्य शासनाला अवघे पाच हजार कोटी रुपयांचा खर्च येईल. त्यासाठी इच्छाशक्तीची गरज असून शासनाने निर्णय घेणे महत्त्वाचे असल्याचे मत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले.

राहरी तालुक्यातील सात्रळ, माळेवाडी डुकरेवाडी, अनापवाडी या भागातील विविध विकास कामांचा लोकार्पण कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. तनपुरे म्हणाले की, लाडक्या बहिणींना आर्थिक सहाय्य देण्यास दुमत नाही, आम्ही योजना सुरू केली काही ठिकाणी प्रकल्प पूर्ण केले तर नियोजित असलेले प्रकल्पाचे काम रखडले आहे त्यासाठी निधीची उपलब्धता केली तर प्रकल्प मार्गी लागतील व शेतकऱ्यांनाही दिवसा वीज मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

सरकार बदलल्यानंतर अनेक कामांना स्थगिती दिली. स्थगिती उठविण्यासाठी न्यायालयात जावे लागले. तिथून न्याय मिळाल्यानंतर कामे मार्गी लागली. या सर्व प्रक्रियेत वेळ गेला. त्यामुळे विकासापासून वंचित असलेल्या गावांना झगडावे लागले.

सोनगाव सात्रळ, धानोरे, कानडगाव, निंभरे, अनापवाडी, तुळापूर या गावातील शेतकऱ्यांना बीजपुरवठा वेळेवर होत नव्हता. अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यासाठी दोन लिंक लाईन बसून प्रश्न कायमचा निकाली काढला. दिवसाआड वीज मिळत होती. आता दररोज बीज मिळत आहे.

गेल्या सात वर्षापासून वीज समस्यांनी शेतकरी ग्रासलेले होते. एकीकडे शेतमालाला भाव नाही तर दुसरीकडे महागडे खते, कीटकनाशक औषधे, वाढती महागाईने शेतकरी त्रस्त झाला आहे. दुधालाही अपेक्षित दर मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी अडकला असून त्यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने पुढाकार घेणे गरजेचे आहे.