Ahilyanagar News : शेती ही केवळ उत्पन्न मिळवण्याचा मार्ग नाही, तर ती एक जीवनशैली आहे. तिची काळजी घेतल्याशिवाय आपल्याला कधीही प्रगती नाही. शेतकऱ्यांनी एकजूट होऊन जमिनीचा पोत सुधारण्याची आणि पर्यावरणपूरक शेती करण्याची गरज आहे, जेणेकरून शेतीचा भविष्यकाळ सुरक्षित आणि समृद्ध होईल.
सध्याच्या काळात शेतीत एक मोठा बदल घडताना दिसत आहे. काही वर्षांपूर्वी, शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीला चांगला मोबदला मिळत होता, पण आता परिस्थिती बदललेली आहे. शेतीत एकरी उत्पादन कमी होत आहे आणि त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होतोय. यामागे विविध कारणं आहेत, पण सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जमिनीचा पोत. जमिनीला योग्य पोषण न मिळाल्याने, ती उत्पादनक्षम राहात नाही आणि शेतीचे उत्पन्न घटत चाललेलं आहे.
आपल्याकडे शेती म्हणजे जीवन असे सांगितलं जातं, पण आज काळ वेगळा आहे. शेतीच्या घटत्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांचे जीवन सध्या संकटात सापडले आहे. हे फक्त काही शेतकऱ्यांची समस्या नाही, तर हे समग्र कृषी क्षेत्रासमोर एक मोठं संकट उभं राहात आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे जमिनीचा पोत कमी होणं,ज्यामुळे एकरी उत्पादन घटत चाललं आहे.
पूर्वी जेव्हा शेतकऱ्यांचे उत्पन्न चांगले होते, तेव्हा जमिनीतील पोषणतत्त्वांचा समतोल अधिक होता. पण आता जमिनीचा पोत खूपच घसरला आहे. कमी पोषणतत्त्व, अधिक रासायनिक खतांचा वापर, आणि सेंद्रिय शेतीकडे दुर्लक्ष यामुळे पीक उत्पादनात घट होत आहे.
या सर्वांचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत आहे. खर्च जास्त, उत्पादन कमी, आणि उत्पन्नाच्या तुलनेत खर्च कमी होणं अशा परिस्थितीत शेतकरी कोणत्या परिस्थितीत शेती करत आहे, याची कल्पनाही करवत नाही.
याशिवाय, हवामानातील बदल, अवकाळी पाऊस आणि पिकांवरील रोग यांचा पिकावर गंभीर परिणाम होतो. पाऊस वेळेवर पडत नाही, तर काही वेळा अतिवृष्टी होते, ज्यामुळे पिकांचं नुकसान होतं. पिकांवर रोगांचा हल्ला होतो आणि तो नियंत्रित करणे शेतकऱ्यांसाठी कठीण बनतं. त्यामुळे उत्पन्नात अधिक घट होते आणि शेतीच्या खर्चाच्या ताळमेळाचं गणित जुळवणं शेतकऱ्यांना कठीण होतं.
खते, बियाणे आणि यंत्रसामग्रीच्या किंमती वाढत आहेत. मजुरीचे दरही वाढले आहेत. यंत्रं सामुग्रीचं भाडं, शेणखताचे दर आणि बियाण्यांचा खर्च वाढला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. तसेच, सेंद्रिय पद्धतीकडे दुर्लक्ष होत आहे, ज्यामुळे जमीन आणखी खराब होत चालली आहे.
आणखी एक मोठं कारण म्हणजे शेतकऱ्यांची सतत एकच पीक घेण्याची पद्धत. याला ‘मोनोकल्चर’ म्हणतात. या पद्धतीमुळे जमिनीतील पोषणतत्त्व कमी होतात आणि पीक उत्पादन घटतं. विविध पिकांची लागवड करणं, सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणं, हे आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.
आपल्या पूर्वजांनी ज्या काळात शेती केली त्यावेळी उत्पादन खूप चांगलं होतं, पण आज मात्र उत्पादन कमी होऊ लागलंय. एकाच पीकावर अवलंबून राहणं, रासायनिक खतांचा अधिक वापर करणं, हे सगळं शेतीसाठी तात्कालिक फायदेशीर असलं तरी, दीर्घकाळात याचा मोठा फटका बसतो.
आता वेळ आली आहे की, शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावं, जमिनीचा पोत सुधारावा आणि पिकांची विविधता वाढवावी. हे एकदाच करून होत नाही, त्यासाठी दीर्घकालीन नियोजन आवश्यक आहे. सरकार आणि कृषी तज्ञांनी यावर गंभीरपणे काम करावं, आणि शेतकऱ्यांना तशा पद्धती शिकवाव्यात. सरकारी अनुदान, योग्य खतांचे वापर आणि पिकांची विविधता शेतकऱ्यांच्या भविष्याला उज्ज्वल बनवू शकते.