Ahilyanagar news : मुंबई येथील आझाद मैदानावर आज राज्यात स्थापन होणाऱ्या नवनिर्वाचित मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा होत आहे. त्यानिमित्ताने मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळ पक्षाचा गटनेता म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. तसंच, दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची चर्चा आहे.
या शपथविधी सोहळ्याला अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असल्याने आझाद मैदान व आसपासच्या परिसरात जोरदार तयारी सुरू आहे. शपथविधी सोहळ्यासाठी मुंबई पोलिसांनी दक्षिण मुंबईतील आझाद मैदानाच्या परिसराभोवती व्यापक सुरक्षा व्यवस्था केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, मोठ्या संख्येने नागरिक, मान्यवर आणि अति महत्त्वाचे व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना शहरात कडक सुरक्षा आणि कायद्याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.
या शपथविधी सोहळ्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील एका सर्वसामान्य घरातील आत्या व भाच्याला शपथविधीचे निमंत्रण मिळाले आहे. त्यामुळे हे दोघे या शपथविधीला जाणारा आहेत. कोण आहेत हे आत्या व भाचा जाणून घेऊया.
नजिक चिंचोलीच्या रहिवाशी रेणुका सुनील गोंधळी यांचा कनकोरी (ता. गंगापूर) येथील ६ वर्षे वयाचा भाचा वेदांत हा २०१९ मध्ये पित्ताशयाच्या कर्करोगाने पीडित होता. वेदांतचे वडील वाळुंज औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत काम करतात तर आई शेतात मजुरी करते. अशा अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील या बालकाच्या उपचाराचा खर्च पालकांना पेलवणे शक्य नव्हते.
त्याच्या पालकांसह नातेवाईकांनी आपल्या परीने मदत करून त्यावर उपचार सुरू केले. मात्र, या उपचाराचा मोठा खर्च भागविणे अडचणीचे ठरू लागले. पालकांची सारी पुंजी त्यासाठी खर्ची पडली, त्यामुळे पवार कुटुंबिय चिंताग्रस्त झाले.
अशावेळी आत्या श्रीमती रेणुका सुनील गोंधळी यांनी या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मोबाईलच्या माध्यमातून मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना संदेश पाठविला. या संदेशाची दखल घेऊन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून या बालकावरील उपचारापोटी तात्काळ १ लाख ९० हजारांची मदत करण्यात आली.
महाराष्ट्रातील एकाही रुग्णावर पैशाअभावी उपचार थांबता कामा नये, असा कानमंत्र डॉ. ओमप्रकाश शेटे यांना देणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत.
लाखो रुग्णांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्याची संधी आपणास लाभली आहे. महाराष्ट्रातील काही निवडक रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना विशेष अतिथी म्हणून या शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहण्याची संधी लाभली आहे.