Ahilyanagar news : सहा वर्षांपूर्वी, २०१८ साली शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर, तसेच राष्ट्रवादीत फूट पडल्यावर खा. लंके यांनी अचूक टायमिंग साधत अनेक निर्णय घेतले. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात दाखल झालेल्या लंके यांनी अजितदादांची आणि आपली सावड असून त्यांचे आपल्याला वावडे नसल्याचे अनेकदा बोलून देखील दाखवले होते .
खा.लंके हे शरद पवारांबरोबर असोत की अजितदादांसोबत, मात्र त्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयातील भिंतींवर शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची छायाचित्रे कायम राहिलेली आहेत. खा. लंके हे एकाच वेळी पवार कुटुंबातील दोन्ही पार्टीशी सलोखा ठेवून आहेत.
त्यामुळे नजिकच्या काळात जर ते अजितदादांबरोबर दिसले, तर आश्चर्य वाटायला नको. कारण देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात उलथापालथ होत असताना, पारनेर तालुका व अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी खा. लंके यांनी काही वेगळा सकारात्मक निर्णय घेतला तर त्यात नवल वाटायला नको.
लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी आपण अजितदादांबरोबर असल्याचे सांगतात मतदारसंघातील विविध कामासाठी मोठा निधी मिळवल्यानंतर ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच लंके यांनी यु टर्न मारला अन थेट शरद पवार यांच्या गटात प्रवेश करत सर्वांनाच धक्का दिला.
दरम्यान लोकसभेला जिल्ह्यातून तिकीट मिळवत विजय संपादन केला. मात्र आता विधानसभेला लंके यांनी पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघातून उभे केले होते. ज्याप्रमाणे लोकसभेत लंके यांनी मी फकीर असल्याचा प्रचार केला होता.
मतदारसंघातील नागरिकांनी मतदान केले होते त्यामुळे यावेळी देखील असाच काहीसा त्यांचा प्रयत्न होता मात्र विधानसभेला त्यांना नागरिकांनी नाकारले अन विधानसभा निवडणुकीत राणी लंके यांचा धक्कादायक पराभव झाला. राज्यात महाविकास आघाडीचे ‘पानीपत’ झाले. त्यामुळे सैरभैर झालेल्या कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने चिंतन बैठकीचे आयोजन केले होते.
कार्यकर्त्यांच्या या चिंतन बैठकीत बोलताना, खासदार निलेश लंके यांनी येत्या महिनाभरात ‘गुड न्यूज’ देणार असल्याचे सुतोवाच केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळेच आता ते लवकरच सत्तेच्या परिघात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्येही उत्साह निर्माण झाला आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवारांनी खा. लंके यांच्याशी संपर्क साधून, पराभवाने खचून जाऊ नका, पुढे भरपूर काम करायचे असल्याचा सल्ला दिला होता.
त्यामुळे लंके यांचे ते वक्तव्य फक्त कार्यकर्त्यांना उभारी देण्यापुरते केले नसल्याचे लंके यांना जवळून ओळखणाऱ्या कार्यकत्यांना, निकटवर्तीयांना जाणीव आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन आठवड्यात खा. लंके हे वेगळ्या राजकीय भूमिकेत दिसतील, अशी अटकळ बांधली जात आहे. जर असे घडल्यास जिल्ह्याच्या राजकारणाचे समीकरणे बदलतील हे मात्र निश्चित आहे .