Ahilyanagar News : जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असलेले भंडारदरा कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य. या भागात कायम पर्यटनकांची वर्दळ असते. हरिश्चंद्र गड याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे येथील कोकणकडा. ३००० फुटांपेक्षाही उंच असा हा कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा आहे.

पावसाळ्यात या गडाचे सौदर्य काही औरच असते. वनस्पतींची विविधता या गडाएवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही. करवंद, कारवीच्या जाळी , धायटी , उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात. या भागातील प्राणिवैभव मात्र शिकारींमुळे बरेच कमी झाले आहे.

तरीही कोल्हे, तरस, रानडुकरे, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे इत्यादी प्राणी आढळतात. मात्र अनेकदा या ठिकाणी फिरताना अपघात घडतात.
दोन दिवसांपूर्वीच हरिश्चंद्र गडावर दोन तरुणांचे सांगाडे सापडले होते. त्यापाठोपाठ आता मधमाशांनी चावा घेतल्याने नऊ शाळकरी मुले जखमी झाले आहेत.

निफाड तालुक्यातील करंजगाव येथील येथील शाळेची हरिश्चंद्र गडावर सहल आली असताना दुपारी गड पाहून खाली उतरत असताना मधमाशांनी चावा घेतल्याने नऊ मुले जखमी झाले आहेत.

गडाच्या खाली एका कपारीत मधमाशांचे पोळे होते त्याला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने दगड मारल्याने ते उठले आणि शाळेतील नऊ विद्यार्थ्यांना मधमाशांनी चावा घेतला. स्थानिक ग्रामस्थांच्या व सरपंचाच्या मदतीने त्यांना तातडीने राजूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून डॉ. अभिनय लहामटे व त्यांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे.

शनिवारी नाशिक जिल्ह्यातील संस्कार निकेतन या वैदिक पाठशालेचे ३५ विद्यार्थी सहलीसाठी आले होते. त्यांनी दिवसभर गडावर सर्व पॉईंट बघितले. रविवारी सकाळी गडावर नास्टा, जेवण करून दुपारी अडीच वाजता ते गडावरून खाली उतरत असताना ही दुर्घटना घडली.

वेदांग गौराग पाटील, (वय १५ वर्ष) अथर्व शशिकांत पाटील (वय १५) आदित्यराज मेहता (वय १३) मित जगदिश म्हात्रे (वय १८) विभुती विजय धोत्रक (वय १२) अखिलेश नितिन वाघ (वय ११) मयुर प्रदिप आहेर (१२ वय) दिव्या अल्पेशभाई पटेल (वय १३) ध्रुव दिव्येशभाई बंदारिया (वय ११) या नऊ मुलांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत.