Ahilyanagar News : एसटी महामंडळात कर्मचाऱ्यांच्या रजेबाबत आणि कामगिरी (ड्युटी) बाबत गेल्या अनेक वर्षांपासून पक्षपातीपणा सुरू असल्याचा आरोप अलीकडेच एसटी कर्मचारी संघटनांनी केला होता. ही बाब गांभीर्याने घेत एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांच्या रजा आणि कामगिरीबाबत स्पष्टता आणि सुसूत्रता आणण्यासाठी राज्यातील आगारांना सूचना परिपत्रक काढण्यात आले आहे.
यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना रजा देणे, कामगिरी लावणे यामध्ये अखेर स्पष्टता येणार असून बहुतांश आगारांत चाललेला मनमानी कारभार लवकरच थांबणार असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे.
राज्यातील अनेक शासकीय महामंडळे व उपक्रम यांच्या कर्मचाऱ्यांना रजा देण्याच्या पद्धतीत व एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना रजा देण्याच्या पद्धतीत खूप मोठा फरक आहे. इतर शासकीय उपक्रमामध्ये रजा देण्याची एक विशिष्ट पद्धत आहे.
कर्मचाऱ्याला अचानक काही काम निघाल्यास किंवा आजारी पडल्यास रजा दिली जाते, पण एसटीमध्ये मात्र कर्मचारी आजारी पडला तरी त्याला कामगिरी करावी लागते.
७६ वर्षे पूर्ण झालेल्या या उपक्रमात अजूनही किती कर्मचाऱ्यांना रजा देता येईल किंवा ते अचानक आजारी पडल्यास किंवा अचानक काम निघाल्यास त्याला कशी रजा देता येईल. याबद्दल कुठलीही स्पष्टता, निकष किंवा नियम घालून दिलेले नाहीत. हे विदारक चित्र असून नेहमी अत्यावश्यक सेवा असल्याचे कारण देत रजा नाकारली जाते.
परिणामी अचानक काही काम निघाल्यास किंवा आजारी पडल्यास नाइलाजास्तव कर्मचारी कामावर येऊ शकत नाही. अशा वेळी त्यांच्या खात्यावर २०० ते ३०० दिवस रजा शिल्लक असतानासुद्धा त्यांची ही गैरहजेरी लिहिली जाते, असा आरोप एसटी कर्मचारी संघटनांनी केला होता.
याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने आपली ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गर्दीचा हंगाम, यात्रा व सणासुदीचा कालावधी वगळता उर्वरित कालावधीत चालक-वाहकांची रजा शिफारशी अधिकार वाहतूक निरीक्षक/ सहाय्यक वाहतूक अधीक्षक यांच्या अखत्यारित देण्यात यावेत.
तसेच रजा मंजुरीसाठी अ, ब व क नोंदवही ठेवण्यात यावी, अशा सूचना एसटी महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत. यामुळे आगामी काळात पक्षपातीपणा थांबणार असून कार्यात स्पष्टता येणार असल्याचे दिसून येत आहे.