Ahilyanagar News : काँग्रेसला जनतेने धडा शिकवला आहे. एकदा त्यांनी बघावं, ते कुठून कुठपर्यंत आलेत, त्यांनी जी काही लाज राहिली आहे, तेवढी तरी राखावी, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. धनंजय मुंडे यांनी केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आ. धनंजय मुंडे यांनी गुरुवारी साईदरबारी हजेरी लावत साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते शिर्डी माझे पंढरपुर आरती करण्यात आली. याप्रसंगी साईबाबा संस्थानच्या वतीने उपकार्यकारी अधिकारी संदीप भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष विशाल भडांगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

साई दर्शनानंतर आ. धनंजय मुंडे यांना प्रसारमाध्यमांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ईव्हीएमबद्दल केलेल्या आरोपाबाबत विचारले असता मुंडे म्हणाले, की तुम्ही जेव्हा लोकसभेत जिंकता तेव्हा तुम्हाला कोणी जिंकवलं तर जनतेने, जेव्हा तुम्ही विधानसभेत हरता तेव्हा तुमची हार ही ईव्हीएममुळे झाली, अशा पद्धतीचा सुरू असलेला भाबडेपणा महाराष्ट्रातील जनतेला कळून चुकला आहे.

ईव्हीएमबाबत मतदान कसं झालं, उशिरा का झालं? याबाबत बोलण्यात काहीही अर्थ नाही. झालेला पराभव मोठ्या मनाने मान्य करावा लागतो. जसा आम्ही लोकसभेच्या निवडणुकीनंतर मान्य केला. मी तेव्हा ईव्हीएम वगैरे बोललो नाही. त्या पराभवानंतर पुन्हा जनसेवा केली आणि जनसेवेनंतर विधानसभेला जनतेने अभूतपूर्व यश महायुतीला दिल आहे.

जनतेने आम्हाला दिलेले यश हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठ्या मनाने कबूल करावं, असेही त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत विचारले असता ते म्हणाले, देवेंद्रभाऊंची भेट कायम होत असते आणि रोज होते.

आज अराजकीय विषयांवर त्यांच्याशी चर्चा करायची होती. त्यामुळे मी त्यांची भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या आधीदेखील साईबाबांचे मी दर्शन घेतले होते.

आज निवडणूक झाल्यावरदेखील दर्शन घ्यायला शिर्डीला आलो आहे. यावेळी आपल्या मनातील श्रद्धेपोटी शिर्डीला येऊन साईबाबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद मागितला. जनतेची सेवा करण्यासाठी सामर्थ्य, बळ, विवेकबुद्धी लागते, हेच साईबाबांकडे मागितले असल्याचे आ. मुंडे यांनी सांगितले.