Home अहिल्यानगर एका ‘क्लिक’ची किंमत मोजावी लागली तब्बल ४७ लाख रुपये ; डॉक्टरसोबत घडले...

एका ‘क्लिक’ची किंमत मोजावी लागली तब्बल ४७ लाख रुपये ; डॉक्टरसोबत घडले असे धक्कादायक …!

Ahilyanagar News : शहरातील एक डॉक्टर फेसबुकवर शेअर ट्रेडींग कसे करावे व शेअर ट्रेडिंगमध्ये नफा कसा मिळवायचा याबाबत जाहिरात पाहत होते. अशाच एका जाहिरातीवर त्यांनी क्लिक केले. मात्र या एका ‘क्लिक’ची त्यांना तब्बल ४७ लाख रुपये किंमत मोजावी लागली आहे.

विजय नामदेव गाडे (वय ४२ रा. नंदनवन कॉलनी, एकविरा चौक, पाईपलाईन रस्ता, सावेडी) असे फसवणूक झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी सोमवारी (२९ जुलै) येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शेअर ट्रेडिंगमध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून या डॉक्टरची ४७ लाख तीन हजार ५४३ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आयसी ग्रुप गोल्ड स्टॉक क्लब ए ५ या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील अनिका शर्मा नामक महिलेविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, डॉ.गाडे यांचे नेवासा फाटा येथे हॉस्पिटल असून ते कुटुंबासह नगरमध्ये राहतात. ते १९ जून २०२४ रोजी फेसबुकवर शेअर ट्रेडींग कसे करावे व शेअर ट्रेडिंगमध्ये नफा कसा मिळवायचा.

याबाबत जाहिरात पाहत असताना सदर जाहिरातीवर क्लिक केले असता एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आली व त्यावर त्यांनी क्लिक केले असता त्यांचा आयसी ग्रुप गोल्ड स्टॉक क्लब ए ५ या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये समाविष्ठ झाला.

त्या ग्रुपचे अॅडमिन अनिका शर्मा हिने तिच्या व्हॉट्सअॅप नंबरवरून डॉ. गाडे यांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर संपर्क करून ट्रेडींग बाबत माहिती दिली. आम्ही सांगेल त्या पध्दतीने गुंतवणूक करा, तुम्हाला अधिक परतावा मिळेल असे सांगून तिने डॉ. गाडे यांचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर तिने सांगितल्याप्रमाणे डॉ. गाडे यांनी तर त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून सुरुवातीला ३९ लाख तीन हजार ५४३ रुपयांची रक्कम भरली.

दरम्यान, त्यानंतर डॉ.गाडे यांनी अनिका शर्मा हिला गुंतवणूक केलेल्या रक्कमेचा परतावा मिळण्यासाठी विचारणा केली असता तिने सांगितले की, ‘आयपीओ’ मध्ये तुम्हाला लॉटरी लागली आहे.

तुम्ही अधिक पैशाची गुंतवणूक केली असता तुम्हाला १५० ते १६० टक्के अधिक परतावा मिळेल. तिने सांगितल्याप्रमाणे डॉ. गाडे यांनी ११ जुलै २०२४ रोजी त्यांच्या बैंक ऑफ बडोदाच्या खात्यातून आठ लाख रुपयांची रकम आरटीजीएसव्दारे पाठविली.

त्यानंतर डॉ. गाडे यांनी अनिका शर्मा हिच्याकडे वेळोवेळी पैशाची मागणी केली असता तुम्ही आणखी ४० लाख रुपयांची रक्कम भरा नाही तर तुमचे अकाऊंट फ्रिज होईल व तुम्हाला पैसे परत मिळणार नाहीत, असे सांगितले.

डॉ. गाडे यांनी वेळोवेळी पैशाची मागणी केली असता अनिका शर्मा हिने पैसे परत केले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे डॉ. गाडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे. अधिक तपास प्रभारी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर करत आहेत.