Ahilyanagar News : सध्या मागील काही दिवसांपासून कांद्याला चांगले भाव मिलत असल्याने शेतकरी आनंदात आहेत. तर वाढत्या भावामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा लागवडीकडे वळले आहेत. काही शेतकऱ्यांचे कांदा रोप अवकाळीने गेले, तरीही पुन्हा बियाणे घेऊन रोपे टाकली आहेत, तर काहींनी रोपेही पेरणी केली आहेत.
सध्या जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी पेरणी करून कांदा लागवड केली आहे. सध्या रोपांचे वाढलेले भाव, मजुरीत झालेली वाढ, खत-औषधांचा वाढलेल्या दराचा मेळ बसत नसल्याने कांदा उत्पादन खर्च परवडणारा नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मात्र देखील तरी देखील रीन काढून सन करत आहे.
सध्याचा रब्बी हंगाम कांदा पिकासाठी अधिक पोषक असल्याने शेतकरी कांदा लागवडीत मग्न आहेत. सध्या लागवडीसाठी मजूर मिळत नसले, तरी कुठूनही मजूर उपलब्ध करून कांदा लागवड शेतकरी करत आहेत.
दिवसेंदिवस नगर तालुकाही आता उसाबरोबरच कांदा आगार ओळखला जाऊ लागला आहे. कांद्याला भाव वाढल्याने शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे. कांदा रोपांनाही भाव वाढला आहे.
परिसरात शेतकऱ्यांकडून बाजारात येणाऱ्या कांद्याची आवक दरवर्षीच्या तुलनेत कमी-अधिक प्रमाणात होत आलेली आहे. कांदा बाजारात प्रतिकिलो ४० ते ५० रुपये दराने विकला जातो. पण कांद्याच्या रोपाला कांद्यापेक्षा अधिक भाव असून, सध्या एकरभर कांदा लागवडीच्या रोपासाठी २५ ते ३० हजार रुपये मोजावे लागत आहेत.कांद्यापेक्षा रोपाला अधिक भाव आल्याने यंदा कांद्याची लागवड महागडी ठरत असली, तरी कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.
यंदा रोपांची मागणी वाढल्याने तालुक्यात ६० ते ७० टक्के कांदा लागवड होण्याचा अंदाज आहे. सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांकडे उन्हाळी कांदा लागवड सुरू आहे. शेतकरी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात नवीन कांद्याची लागवड करतात. अल्पभूधारक शेतकरी कांद्याच्या बियाण्यांपासून रोपे तयार करून योग्य त्या बाजारभावाने विक्री करतात.
परिसरात यंदा कित्येक शेतकऱ्यांचे टाकलेले रोप पहडक झाले, तर काहीशेतकऱ्यांचा रोप चांगले उतरले, अवकाळी पावसाने रोप घालवल्याने ज्या शेतकऱ्यांचे कांदा रोप टिकले त्यांनी आपली लागवड उरकून दुसऱ्या शेतकऱ्यांना चांगल्या भावात मोठ्या प्रमाणात कांदा रोपांची विक्री करत आहेत. काही शेतकरी मिळेल त्या भावात रोपे विकत घेत असून, आपली लागवड उरकून घेत आहेत.
बाजारात कांद्याची आवक वाढली की कांद्याचे भाव पडतात. कांद्याची टंचाईनिर्माण होते तेव्हा भाव वाढतात. सध्या अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांकडे कांदा नसल्यामुळेच सध्या कांद्याला भाव वाढला आहे. त्यामुळे कांद्याच्या रोपालाही सुगीचे दिवस आले आहेत.
नोव्हेंबरअखेर कांद्याचे भाव स्थिर राहतील, असा अंदाज आहे. सध्या कांद्याला भाव असल्याचा परिणाम म्हणून अनेक शेतकऱ्यांची कांदा लागवडीकडे लगबग सुरू आहे.