Ahilyanagar News : सध्या कांद्याचीअवाक वाढल्याने कांद्याच्या दारात घसरण सुरु झाली आहे. परंतु दर घसरल्याने शेतकरी संतप्त झाले असून ते रस्त्यावर उतरले आहेत. राज्यातील विविध बाजार समित्यांच्या आवारात नवीन कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होऊ लागली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात काल गुरूवारी ९४ हजारांपेक्षा अधिक कांद्याची आवक झाली. पण भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

तर राज्यातील सर्वात मोठी व कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजार समितीत देखील कांद्याची मोठ्या प्रमाणात अवाक झाली होती. देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याची मोठी आवक बाजार समितीच्या आवारात वाढल्याने गेल्या दहा दिवसांत लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात २५०० रुपयांची मोठी घसरण झाली.

कांद्याचे पाच हजार रुपयांच्यावर असलेले कमाल दर २५०० रुपये पर्यंत तर सरासरी दर १५०० रुपयांपर्यंत कोसळल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लासलगाव बाजार समितीतील शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडून संताप व्यक्त केला.

दोन दिवसात कांदा निर्यातीवरील २० टक्के निर्यात शुल्क हटविल्यास तसेच गेल्या दहा दिवसापासून विक्री झालेल्या व विक्री होणाऱ्या कांद्याला दोन हजार रुपये प्रतिक्विंटलला अनुदान द्यावे, ही मागणी मान्य न झाल्यास रेल रोको, जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी कांद्याला चांगले भाव मिळत असल्याने शेतकरी खुश होते गावरान कांदा संपल्याने आता केवळ लाल कांद्याची आवक सुरु होती ती देखील कमी प्रमाणात होती. तर दुसरीकडे कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जात असून त्यासाठी महागडे बियाणे, मजुरी यावर शेतकरी मोठा खर्च करत आहेत. परंतु आता कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी काळजीत पडला आहे.

गत पंधरा- वीस दिवसांपूर्वी ५५०० रूपयांचा दर मिळत होता. पण आता कांद्याच्या दरात घसरण झाली असून हा दर ३००० रूपयांपर्यंत खाली आला आहे. दिवसागणीक कांदयाचे दर कमी होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पाहू जिल्ह्यातील विविध बाजार समितीत कांद्याला मिळाले भाव : अहिल्यानगर बाजार समिती आवारात ६६९१९ क्विंटल कांद्याची आवक झाली. ४०० ते ३००० रूपयांचा दर मिळाला. वांबोरीत ७२२४ क्विंटल आवक झाली. दर २०० ते २८०० रूपये मिळाला.

संगमनेरात १२१८४ किंटल कांद्याची आवक झाली. दर ५०० ते २८११ रूपये विकला गेला जामखेडमध्ये ५२८१ क्विंटल कांद्याची आवक झाली. दर १०० ते ३१०० रूपये मिळाला. शेवगावात २६०० क्विंटल कांद्याची आवक झाली. दर ३४० ते २८०० रुपये मिळाला.