Ahilyanagar News : नगर कांद्याच्या दरात आठवडाभरानंतर प्रतिक्विंटल सुमारे ३०० ते ५०० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. कांद्याच्या अस्थीर दरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही.
सद्यस्थितीत एक नंबर कांदा १५०० ते २००० रूपये दराने विकला जात आहे. तर अपवादात्मक स्थितीत दर्जेदार कांद्याच्या ९६ गोणीला २००० ते २ हजार ३०० रुपयांपर्यंतचा भाव मिळाला आहे.
आठवडाभरापूर्वी १७०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर गावरान कांद्याला मिळाला होता. कांदा निर्यातबंदीनंतर भावात किरकोळ चढउतार दिसून आला असला, तरी अद्याप भावात स्थिरता नाही.
वांबोरी उपबाजारात कांद्याच्या ४ हजार ११७ गोणी कांद्याची आवक झाली होती. त्यात एक नंबर कांद्याला १५०० ते २०००, दोन नंबर कांदा १००० ते १५०० तर तीन नंबर कांदा १०० ते १००० रूपये दराने विकला गेला. परंतु, अपवादात्मक मोठ्या दर्जेदार कांद्याला यापेक्षाही जास्तीचा दर मिळाला आहे.
त्यात ९६ गोणी कांदा २००० ते २ हजार ३०० रूपये प्रतिक्विंटलने विकला गेला तर १४२ गोणी कांद्याला १९०० ते २००० चा भाव मिळाला. याव्यतिरिक्त सर्वाधिक ११७१ गोणी कांद्याला अवघा ५०० ते १ हजार रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
वाढलेली मजुरी, मशागत खर्च, खते, किटकनाशकांचे दर पाहता सध्या मिळत असलेला कांद्याचा भाव शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून टाकणारा आहे.