Ahilyanagar News : यंदा जून महिन्यात वेळेवर पावसाने हजेरी लावली मात्र त्यानंतर हवामानात मोठे बदल झाले. यात अनेकदा संततधार पाऊस कोसळत असल्याने कांद्याचे तसेच कापूस, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे उत्पन्न मोठ्या प्रमाणात कमी झाले परिणामी सध्या बाजारात कांद्याची मागणी आधीक असल्याने त्या तुलनेत पुरवठा कमी होतअसल्याने भाव वाढले आहेत.

सध्या राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे तर दुसरीकडे कांद्याच्या घाऊक भावाने विक्रमी नोंद केली आहे. लाल कांद्याला चार हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. तर गावरान कांद्याला ६ हजारांच्या जवळपास भाव मिळत आहे. त्या दुसरीकडे डाळिंबाच्या भावात आता घसरण होत असल्याचे दिसत आहे. ८ ते १० दिवसांपूर्वी २०० रुपयांच्या जवळपास असेल भाव आता १५० रुपयांवर आले आहेत.

राहाता बाजार समितीत कांद्याला चांगला भाव मिळाला. मंगळवारी कांद्याला जास्तीत जास्त प्रतिक्विंटलला ६००० रुपये भाव मिळाला. कांद्याची आवक काही वाढली असली तरी ती कमी असल्याचे व्यापारी सांगतात.

मंगळवारी कांद्याच्या एकूण ४३२४ गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर १ ला ४८०० ते ६००० रुपये भाव मिळाला. कांदा नंबर २ ला ३७०० रुपये ते ४७५० रुपये भाव मिळाला. कांदा नंबर ३ ला २२०० रुपये ते ३६५० रुपये. गोल्टी कांदा ३८०० रुपये ते ४२०० रुपये. जोड कांदा १२०० ते १७०० रुपये.

सिताफळाच्या ४५९ कॅरेटची आवक झाली. प्रतिक्विंटलला किमान ५०० ते ५००० रुपये तर सरासरी ३५०० रुपये. पेरुच्या ९१ क्रेटसची आवक झाली. पेरुला २५० ते १३०० रुपये तर सरासरी ७५० रुपये भाव मिळाला.

पपईच्या ३४ कॅरेटची आवक झाली. पपईला सरासरी १००० रुपये भाव मिळाला.

डाळिंबाच्या ८१६ कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर १ ला किमान ९१ रुपये तर जास्तीत जास्त १५५ रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर २ ला किमान ५१ रुपये तर जास्तीत जास्त ९० रुपये. डाळिंब नंबर ३ ला किमान २१ ते जास्तीत जास्त ५० रूपये. डाळिंब नंबर ४ ला किमान १० रुपये तर जास्तीत जास्त २० रुपये असा भाव मिळाला. काही दिवसांपूर्वी डाळिंबाला २०० रुपयांच्या जवळपास भाव मिळत होते.

सध्या बाजार समिती कांदा आवक घटल्याने बाजारभावात तेजी आल्याचे जाणकारांचे मत आहे. आवक अल्प आणि मागणी वाढल्याने भावात अजून तेजी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हंगामातील लाल कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, लाल कांद्यापेक्षा गावरान कांदा सर्वाधिक भाव खात आहे. सध्या जिल्ह्यातील बाजारपेठेत गावरान आणि लाल दोन्ही कांदा विक्रीसाठी येत आहे.

सदरचा गावरान कांदा हा मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये साठवलेला असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात घट आणि प्रतवारी खालावली आहे. यावेळी पावसाचा खेळ बिघडल्याने तो लांबला आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये आवक कमी असून, दरात विक्रमी वाढ होताना दिसत आहे.