Ahilyamnagar News : शेतकऱ्यांकडून कांदा घेवून त्यांना थोडेफार पैसे देवून शिल्ल्क पैशांचा बॅलेन्स नसलेल्या बँकेचा चेक देवून तब्बल ६१ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी तालुक्यातील उंदिरगाव येथील कांदा व्यापाऱ्यावर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत बाळासाहेब भाऊसाहेब पेचे (वय ४३, रा. पाचेगाव, ता. नेवासा) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मागील महिन्यात चाळीमध्ये साठवलेला कांदा आपला चुलत भाऊ विठ्ठल याने आपल्याकडील १५ टन कांदा उंदिरगावचा व्यापारी सुहास अनिल बांद्रे याला विकला होता.

माझ्या भावाला कांद्याचे पैसे पुर्ण मिळाले होते. त्यानंतर एकेदिवशी व्यापारी सुहास बांद्रे हा आपल्याकडे आला व त्याच्याशी कांदा विक्रीचा व्यवहार ठरला. तेव्हा बांद्रे हा ट्रक आणि मजूर घेवून आला व ठरल्याप्रमाणे १६ टन कांदा ४१ रूपये प्रतिकिलो या प्रमाणे घेतला आणि आपल्याला व्यापारी सुहास बांद्रे याने ६ लाख ८० हजार रूपयांचा चेक दिला.

त्यानंतर सदर चेक आपण श्रीरामपूर येथील बँकेत भरला असता, रक्कम नसल्याने चेक वठला नाही. त्यानंतर आपण अनेकदा व्यापारी सुहास बांद्रे याला पैश्यासाठी फोन केले मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाल्याने उंदिरगाव येथे तो राहत असलेल्या ठिकाणी गेलो असता, त्याचा कोठेच ठावठिकाणा लागला नाही.

त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे आपल्या लक्षात आले. त्यानंतर अधिक चौकशी केली असता, व्यापारी सुहास बांद्रे (रा. उंदिरगाव) याने आतापर्यंत बेलपांढरी, जेऊर हैबती, पाचेगाव, नेवासा बुद्रुक आदी परिसरातील शेतक-यांचा कांदा खरेदी करून तसेच त्यांना थोडेफार पैसे देवून आणि काही चेक देवून सर्वांची मिळून ६१ लाख ७४ हजार ६५० रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

त्यामुळे बाळासाहेब पेचे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सुहास अनिल बांद्रे (रा. उंदिरगाव, ता. श्रीरामपूर) याच्याविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहे.