Bhandardara Dam
Bhandardara Dam

Bhandardara Dam : जिल्ह्यातील प्रमुख धरणापैकी एक असलेले भंडारदरा धरणाचा जलसाठा खपाटीला गेला आहे. त्यामुळे भंडारदरा धरणामध्ये अवधा ३० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

उन्हाळा आणखी दीड ते दोन महिने बाकी असतानाच भंडारदरा धरणाच्या पाण्याची सध्याची अवस्था बघता धरणाच्या पाणलोटातील गावांना भिषण पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण हे अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी एक समजले जाते. भंडारदरा धरणामधून जायकवाडी धरणासाठी काही महिण्यापुर्वी पाणी सोडले गेले होते.

त्यामुळे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा खालावला होता. त्यातच मागील वर्षी धरणाच्या लाभक्षेत्रात कमी पाऊस पडला. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची तहान वाढली.

पिण्यासाठी व शेतीसाठी भंडारदरा धरणातुन सातत्याने पाणी सोडण्यात आल्याने आज अखेर भंडारदरा धरणाला पाणीसाठा खालावला असून धरणात फक्त ३० टक्के पाणी शिल्लक राहिले आहे.

भंडारदरा धरणाचे पोट खपाटीला गेले असून आणखी जवळ-जवळ जोन महिने उन्हाळा शिल्लक आहे. दरवर्षी धरणाच्या लाभक्षेत्रात सात जूनला पाऊस सुरु होईल.

याची खात्री नसल्याने धरणाच्या पाण्यावर आधारीत असलेल्या पाणी योजना कोरड्या पडणार असून धरण पाणलोटातील गावांना भिषण पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

शेंडी सारख्या धरणाच्या उशाला असणाऱ्या गावाला सुद्धा मे महिना पाण्यासाठी अतिशय कठीण असणार आहे. मे महिण्याच्या आसपास धरणाचा पाणीसाठा ५०० दलघफुटावर पोहचणार आहे.

निळवंडे धरणाचीही हिच परिस्थिती अशीच असून भंडारदरा धरणातून सोडलेले पाणी निळवंडे धरणामध्ये साठवून नंतर ते प्रवरापात्रातून पिण्यासाठी सोडण्यात येत आहे.

पाऊस जर लांबणीवर पडला तर आदिवासी गावांना पाण्यासाठी कासाविस व्हावे लागणार असून कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील उडदावणे गावात भिषण पाणीटंचाई भासत आहे.

काल रविवारी (दि.२८) सकाळी भंडारदरा धरणामध्ये ३३१२ दलघफु पाणी शिल्लक असून भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ३० टक्के झाला आहे.

भंडारदरा धरणाच्या विजनिर्माण केंद्रातून ७९० क्युसेसने प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरु आहे. वाकी धरणामध्येही ५८ टक्के पाणी शिल्लक असून धरणामध्ये साधारणतः एक टीएमसी पाणी साठविले जाते.

निळवंडे धरणामध्ये २५३५ दलघफु पाणी शिल्लक असून १ हजार क्यूसेसने पाणी प्रवरा नदीमध्ये सोडण्यात आले आहे.