Ahilyanagar News : जिल्ह्यात कांदा पिकांचा बोगस पिकविमा उतरवण्यात आला असल्याचे समोर आले होते. दरम्यान विमा कंपनीकडून तक्रार आल्यानंतर कृषी विभागाने पिक विमा उतरवलेल्या क्षेत्राची प्रत्यक्षात केलेल्या तपासणीत ही फसवेगिरी उघड झाली होती. त्यात आता फळबागांचा देखील समावेश झाला असून यात फळबागा नसतानाही विमा काढल्याचा प्रकार जिल्ह्यात समोर आला आहे.

दोन हजार ५५ ठिकाणी फळबागा नसताना व ६६९ ठिकाणी फळबागा लागवडीपेक्षा जास्त क्षेत्राचा विमा काढल्याचे कृषी विभागाने केलेल्या तपासणीतून स्पष्ट झाले आहे.

दोन हजार ७२४ शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज केले होते. हे प्रकरण उघड झाल्यामुळे शासनाचे ८९ लाख ४४ हजार रुपयांची रक्कम वाचली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी ही माहिती दिली.

चार दिवसांपूर्वीच कृषी विभागाने कांद्यातून शेतकऱ्यांनी पीकविमा लाटण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आणला होता. आता तो प्रकार फळबाग लागवडीत देखील झाल्याचे समोर आले आहे.

सन २०२४-२५ या वर्षात जिल्ह्यातील १३ हजार ८५ शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीसाठीच्या विम्यासाठी सहभाग नोंदविला असून ७ हजार ५१५.२४ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. यात जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४ मध्ये शेतकऱ्यांनी उतरवलेल्या कांदा पिक विमा योजनेत बनवेगिरी झाल्याची तक्रार राज्य पातळीवरून कृषी आयुक्तालय पुणे आणि कृषी सचिव यांच्याकडे करण्यात आली होती.

यामुळे नगरसह राज्यातील काही जिल्ह्यात खरीप हंगामात उतरवलेल्या कांदा विमा आणि प्रत्यक्षात असणारे कांदा पिकाचे लागवड क्षेत्र याची तपासणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली.

यात जिल्ह्यातील नगर, श्रीगोंदा, पाथर्डी, राहाता, कर्जत, जामखेड, संगमनेर, पारनेर, कोपरगाव, राहुरी आणि नेवासा या सात तालुक्यात ७ हजार २४१ शेतकऱ्यांनी २ हजार ५६ हेक्टवर पेरणी नसतांना, पेरणी क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्र दाखवून सुमारे १ कोटी २७ लाखांचा विमा उतरवला होता.

ही बाब कृषी विभागाच्या तपासणीनंतर समोर आल्यानंतर कृषी विभागाने ७ हजार २४१ शेतकऱ्यांचा १ कोटी २७ लाख रुपयांचा विमा रद्द केला आहे.