Ahilyanagar News : मागील काही दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे नदी नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे तर अनेक भागात पावसाचे पाणी साचवून राहिलेले आहे. त्यात या काळात सूर्याचे दिवसभर दर्शन देखील होत नसल्याने शहरासह जिल्ह्यात विषाणूजन्य आजार असणाऱ्या डेंग्यू, चिकनगुनिया रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

या बदलेल्या हवामानाचा नागरिकांना तसेच लहान मुलांना चांगलाच फटका बसला आहे. सध्या जिल्ह्यातील शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नागरिकांना तसेच लहान मुलांना सर्दी, ताप आदी त्रास होत असल्याने सरकारी तसेच खासगी दवाखाने फुल्ल झाले आहेत. आजही काहीजण घरगुती उपचार करत आहेत.

जिल्ह्यात सध्या १५८ जणांना डेंग्यूची, १९ जणांना चिकनगुनियाची बाधा झाल्याचे शासकीय आकडेवारीवरून समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नागरिकांनी ताप, अंगदुखी यासह अन्य समस्या निर्माण झाल्यास नजीकच्या आरोग्य संस्थेशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात ९४० जण संशयीत डेंग्यूचे रुग्ण होते. यातील १५८ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच शासकीय आरोग्य संस्थांनी केलेल्या तपासणीत ३४ जणांना चिकनगुनिया झाल्याचा संशय व्यक्त होत होता. यातील १९ जणांचे अहवाल बाधितआलेला आहे.

जिल्ह्यात अनेक गावात सध्या फॉगींगसह अन्य उपाययोजना राबवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी देखील शहरासह ग्रामीण भागात पावसाचे पाणी साठणार नाही. त्यातून डासांची उत्पत्ती होणार नाही, यावर लक्ष द्यावे.

ताप, अंगदुखी असल्यास वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार करावेत, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.