Ahilyanagar News : अन्याय होईल, तेव्हा धर्माच्या संरक्षणासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे,” असे आवाहन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राहाता येथे आयोजित मोर्चादरम्यान ते बोलत होते.

बांगलादेशातील हिंदूंवर दिवसेंदिवस अत्याचार वाढत आहेत त्यामुळे या अत्याचारांविरोधात आता जिल्ह्यात सर्व हिंदू समाज आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी या विरोधात आंदोलने काढून विरोध दर्शवला जात आहे.

याच अनुषंगाने सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविरोधात राहाता शहरात मोर्चाचे आयोजन केले होते. राजा वीरभद्र महाराज मंदिरासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करून मोर्चाची सुरुवात झाली. युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील आणि शेकडो हिंदू समाज बांधवांनी भारत माता की जय आणि जय श्रीरामच्या घोषणांनी मोर्चात सहभाग घेतला.

मोर्चानंतर वीरभद्र मंदिरासमोर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. विखे पाटील म्हणाले की, आपल्या हिंदू धर्मियांवर अन्याय होत असेल, तर त्याच्या संरक्षणासाठी आपण सर्वांनी संघटित होणे गरजेचे आहे. आज संपूर्ण भारतभर अशा निषेध मोर्चाचे आयोजन होत आहे. आपण एकत्र येऊन या घटनांचा निषेध केला पाहिजे, असे ते म्हणाले.

नवनाथ महाराज म्हस्के यांनी बांगलादेशातील हिंदू महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा निषेध करताना सांगितले की, हिंदू धर्म नष्ट करण्याचे काम बांगलादेशात सुरू आहे.

त्यामुळे हिंदू समाजाने संघटित होणे गरजेचे आहे. भारताच्या फाळणीनंतर काश्मीरमध्ये हिंदूंच्या झालेल्या कत्तलींचाही त्यांनी उल्लेख केला आणि संघटित होण्याचे आवाहन केले. मुक्ताताई दिघे यांनीही बांगलादेशातील अन्यायाविरोधात एकजूट होण्याची गरज व्यक्त केली.