Ahilyanagar News : वादग्रस्त माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. हायकोर्टाने खेडकरला अटकपूर्व जामीन देण्यास सोमवारी नकार दिला.

त्यामुळे खेडकरवर अटकेची टांगती तलवार आहे. नागरी सेवा परीक्षेतील कथित फसवणूक आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) तसेच दिव्यांग कोट्याचा गैरफायदा घेतल्याबद्दल खेडकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूजा खेडकरला ऑगस्ट महिन्यात अटकेपासून संरक्षण मिळाले होते. दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती चंद्रधारी सिंह यांच्या खंडपीठाने गत महिन्यात तिच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर सुनावणी पूर्ण केली होती.

सोमवारी याप्रकरणी निकाल देताना हायकोर्टाने खेडकरची याचिका फेटाळून लावली. प्राथमिकदृष्ट्या पूजा खेडकरविरोधात सबळ पुरावे असल्याचे दिसते आणि कटाचा उलगडा करण्यासाठी तपासाची गरज आहे. त्यामुळे अटकेपासून अंतरिम संरक्षण रद्द करण्यात येत असून अटकपूर्व जामीन याचिका फेटाळण्यात येत आहे, असे न्यायमूर्ती चंद्रधारी सिंह म्हणाले.

घटनात्मक संस्थेसोबतच समाजाची देखील फसवणूक केल्याचे हे प्रकरण आहे, असेही न्यायमूर्तीनी नमूद केले. दिल्ली पोलीस आणि यूपीएससीच्या वतीने वकिलांनी खेडकरला अटकपूर्व जामीन देण्यास विरोध केला होता.

तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे या प्रकरणात मोठे षड्यंत्र समोर येत असल्याचे दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. पूजा खेडकरविरोधात आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी २०२२ सालच्या यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षेच्या आपल्या अर्जात चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे.

पूजा खेडकरने मात्र आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. यूपीएससीने जुलै महिन्यात खेडकरविरोधात कारवाई सुरू केली होती. दिल्ली पोलिसांनी तिच्याविरोधात भारतीय दंड संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि दिव्यांग व्यक्तींचे अधिकार कायद्यातील तरतुदीअंतर्गत एफआयआर दाखल केला आहे.