Ahilyanagar News : मागील काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरून चर्चेत आलेल्या छिंदम बंधूंना चांगलेच महागात पडले होते. या प्रकरणानंतर काही काळ या दोन्ही बंधू शांत बसले होते. मात्र दिवसेंदिवस आपले करारनामे सुरूच आहेत.

या दोघांनी अहिल्यानगर शहरातील तब्बल १०४ वर्षांचे असलेले श्री मार्केडेय मंदिर पाडून त्यातील देव-देवांच्या मूर्ती तोडफोड करत विटंबना केली. याबाबतचा दावा पद्मशाली समाजातीलच ज्येष्ठ नागरीक लक्ष्मण बुरा यांनी केला आहे. त्याबदल श्रीकांत हिंदम, श्रीपाद छिंदम, मनोज दुलम त्यात सहभागी असलेल्यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

याबाबत बुरा यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे तक्रार दाखल केली असून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा राग अनावर होऊन शहारामध्ये दंगलही उसळू शकते, अशी भीती बुरा यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, पद्मसाळी समाजाचेच ज्येष्ठ नागरीक बुरा यांच्या या तक्रारीनंतर अहिल्यानगर शहरात खळबळ उडाली असून, अनेकांना झाल्या प्रकाराची माहिती या तक्रारीनंतर समजली असल्याचेही पुढे आले आहे.

याबाबत पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, श्री मार्केडेय मंदिर देवस्थान हे अहिल्यानगरमधील अत्यंत पुरातन मंदिर असून, या मंदिरास तब्बल १०४ वर्ष पूर्ण झालेले आहे. नगर शहरात श्री मार्केडेय यांचे भाविक भक्त मोठ्या प्रमाणात आहेत. नगर शहरातील ३० ते ३५ हजार लोकसंख्या असलेल्या पद्मसाळी समाजाचे श्रद्धास्थान आहे.

या मंदिरात रोज शेकडो भाविक पुजा, अर्जा करण्यासाठी येतात. तसेच या मंदिर परिसरात गजानन महाराज, नवनाथ, श्री दत्त, हनुमान, नवग्रह, शिवलिंग असे अन्य देवतांचीही छोटी मंदिरे होती.

त्या देवीदेवतांचे देखील भाविक मोठ्या प्रमाणात पुजाअर्जा करण्यासाठी मंदिरात येत होते. असे असताना श्रीकांत छिंदम, श्रीपाद छिंदम, मनोज दुलम, आनंद बंगल, एस. एम. मूल, प्रकाश कोटा, अजय ग्याना, महेश सब्बन, भिमराज कोडम, बाळकृष्ण सिद्धम, विनायक गुडेवार, विजय मामलेटी, राजू म्याना, व इतरांनी जेसीबीच्या साह्याने हे मंदिर पाडले.

यावेळी या मंदिर परिसरातील अन्य देवतांची छोटी मंदिरे पाडून टाकली आहेत. यापूर्वी सन १९६७ मध्ये देखील श्री मार्केडेय महामुनींच्या मूर्तीची विटंबना झाली होती. त्यावेळी देखील नगर शहरात मोठ्या प्रमाणात जातीय तेढ निर्माण झाले होते.

आताही तशीच परिस्थिती असून, यातील आरोपींना अटक न झाल्यास पुन्हा दंगली उसळेल अशी भीती लक्ष्मण बुरा यांनी पोलिस अधीक्षक ओला व जिल्हाधिकारी सालीमठ यांच्याकडे केलेल्या तक्रारीत व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणानंतर छिंदम बंधूंच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान या दोघांवर यापूर्वी देखील विविध प्रकारच्या तक्रारी दाखल आहेत.