Health News : उन्हाळा सुरू असून तापमानही रेकॉर्ड तोडत आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अशा वेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, तर ते आजारी पडू शकतात.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार लहान मुलांमध्ये ऊन सहन करण्याची शक्ती खूप कमी असते. थोड्या उन्हामुळेही ते लगेच आजारी पडू शकतात. अशा वेळी उन आणि उष्णतेपासून मुलांना वाचविणे फार गरजेचे आहे. नाहीतर विनाकारण दवाखान्याचे तोंड पाहायची गरज पडते.
उन्हाळ्यात मुलांना सुटी असते. अशातच त्यांच्यातील ऊर्जा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे ही मुलं उन्हा तान्हाचा विचार न करता खेळायला जातात. अशा वेळी त्यांच्याकडे लक्ष देणे फार आवश्यक असते. अनेकदा मुलं पाणी न पिताच घरातून बाहेर जातात. खेळताना मोठ्या प्रमाणावर घाम येतो. परिणामी शरीरातील पाणी बाहेर पडतं; परंतु मुलं बाहेर खेळायला गेलेले असल्यामुळे तहान लागली तरी ते पाणी पिणं टाळतात. परिणामी शरीरातील पाणी कमी पडून डी हायड्रेशन होण्याची शक्यता असते. कधी कधी उन्हात खेळल्यामुळे उष्माघातासारखा प्रकार होऊन गंभीर परिस्थितीही निर्माण होऊ शकते.
लहान मुले वेळच्या वेळी भरपूर पाणी पितील याकडे घरातील मोठ्या व्यक्तींनी लक्ष द्यावे. लहान मुलं पाणी पिण्यास नको म्हणतात; परंतु लाडी गोडी लावून त्यांना जास्तित जास्त पाणी पाजणे गरजेचे आहे. शरीरात पाण्याचे प्रमाण कायम राहावे, यासाठी फळे, सलाद, फळांचा ज्युस, लिंबू पाणी असे घरगुती पदार्थ मुलांना खायला, प्यायला द्यावेत. तसेच मुलांना उष्णतेपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. मुले उन्हात खेळणार नाही, याकडे लक्ष द्यावे.
उन्हाळ्यात शरीराचं तापमान कमी ठेवण्यासाठी पांढऱ्या रंगाचे कपडे मुलांना घालावेत. गडद रंगाचे कपडे उष्णता शोषून घेतात, तर पांढऱ्या किंवा हलक्या रंगाचे कपडे उष्णता रोधक म्हणून काम करतात. त्यामुळे शरीर थंड ठेवण्यास मदत होते. मुलांना उन्हाळ्यातील आजारांपासून दूर ठेवायचे असेल, तर त्यांना दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत बाहेर पाठवू नका, उलट घरातच ठेवा. त्या काळात त्यांना घरगुती खेळ खेळायला प्रवृत्त करा. वेळ आली तर मोठ्या माणसांनी त्यांच्या बरोबर खेळ खेळावेत. बाहेरचे खेळ खेळण्यासाठी मुलांना सायंकाळी पाठवा.
उन्हाळ्याच्या काळात मुलांना तेलकट, तुपकट, जड अन्नापासून दूर ठेवा. या जंक फुडमुळे शरीराची उष्णता वाढते. अशा प्रकारचे अन्न पचविण्यासाठी शरीराला मोठ्या प्रमाणावर पाणी लागते. त्यामुळे शरीर डी हायड्रेट होऊ शकते. याऐवजी त्यांना टरबूज, खरबूज, द्राक्षं, आंबे अशी फळं खाण्यासाठी द्यावीत. डोळे खोल जाणे, थकवा वाढणे, जुलाब लागणे, ताप येणे, थंडी वाजणे अशी लक्षणे जाणवल्यास ताबडतोब मुलांना दवाखान्यात न्या.