Ahilyanagar News : कर्करोग हा आजार अत्यंत गंभीर असून त्याच्यावर आजवर तरी उपचार नाहीत अशीच अवस्था होती. त्यामुळे ज्याला आहे आजार झाला असेल त्याचा मृत्यू निश्चित असल्याचे मानले जात होते.
कारण या आजारावर आपल्या देशात उपचार उपलब्ध नव्हते व प्रत्येकालाच परदेशात जाऊन हे महागडे उपचार करणे शक्य नसल्याने हा आजार झाला म्हणजे आपला मृत्यू अटळ असल्याचे रुग्ण समजत असे.
परंतु आता घाबरण्याचे काहीच कारण नाही. कारण आता परदेशात अत्यंत महागडी समजली जाणारी व कर्करोग उपचारावर महत्वाची असलेली ‘कार-टी सेल’ थेरपी भारतीय संशोधनानंतर सवलतीत उपलब्ध झाली आहे. या सवलतीचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना होण्यास सुरुवात झाली आहे.
ही थेरपी नुकतीच एसएमबीटी हॉस्पिटलच्या कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये सतरावर्षीय रुग्णावर यशस्वी पार पडली. या रुग्णाचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले असून हा रुग्ण पूर्णपणे कर्करोगमुक्त झाला आहे. ही थेरपी ल्युकेमिया आणि लिम्फोमा यांसारख्या बी-सेल कर्करोगांवर (रोगप्रतिकारक प्रणालीच्या पेशींमध्ये तयार होणारा कर्करोगाचा प्रकार) उपचार करण्यासाठी महत्वाची असल्याचे एसएमबीटी हॉस्पिटलचे रक्तविकार कर्करोगतज्ज्ञ डॉ. गिरीश बदरखे यांनी सांगितले.
कार-टी सेल थेरपी ही मुंबई आयआयटीचे शास्रज्ञ डॉ. राहुल पूरवार आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे कर्करोग विभागातील प्रोफेसर डॉ. हसमुख जैन यांच्या पुढाकाराने रक्ताच्या कर्करोगावर भारतीय संशोधन प्रणाली आहे.
अलिकडेच क्लिनिकल ट्रायलमध्ये दोन रुग्णांवर एसएमबीटीत यशस्वी उपचार करण्यात आले होते. यानंतर एसएमबीटीच्या विशेष केअर प्लस विभागात नागपूरच्या सतरावर्षीय मुलावर तिसरी कार-टी सेल थेरपी करण्यात आली. या रुग्णाचे रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल आले असल्यामुळे हा रुग्ण कर्करोगमुक्त झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
सवलतीच्या दरात होत असलेल्या उपचार पद्धतीचा लाभ आता सर्वसामान्य रुग्णांना मिळण्यास सुरुवात झाली आहे. कार-टी सेल थेरपी उत्तर महाराष्ट्रात एकमेव एसएमबीटी हॉस्पिटल येथे सुरू झाल्याने उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील रुग्णांसाठी आशेचा किरण बनले आहे.
जगातील कॅन्सर उपचारावर होत असलेल्या कोट्यवधी रुपयांचा खर्च भारतीय संशोधनामुळे आता लाखांत आला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या चॅरिटेबल हॉस्पिटल असलेल्या एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये जगातील सर्वात अत्याधुनिक थेरपी करण्यातआल्याने सर्वत्र कौतुक केले जात आहे.