Ahilyanagar News : वर्षानुवर्षे सत्ता भोगणाऱ्या साखर सम्राटांनी तालुक्यासाठी काय केले, असा सवाल करून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, पंचायत समिती सभापतीपद असूनही त्यांना विकास साधता आला नाही.
राजकीय पोळी भाजण्यासाठी या लोकांनी समाजात, जाती-पातीमध्ये भांडणे लावून दिली. त्यामुळे दंगल घडली. त्यांना अध्यक्षपदाच्या वेळी पाठिंबा दिल्याचा आज पश्चाताप होतो आहे, अशी टीका जनशक्ती आघाडीच्या नेत्या हर्षदा काकडे यांनी घुले यांचे नाव न घेता केली.
जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने खंडोबामाळ येथे गुरुवारी आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या.जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने खंडोबामाळ येथे गुरुवारी आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या.
यावेळी जिंकुनी आणिले पाणी या फिल्मचे अनावरण, पाऊले सामर्थ्याची या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे, ज्येष्ठ नेते जगन्नाथ गावडे, पृथ्वीसिंह काकडे, सचिन आघाट, बबन माने, नारायण महाराज गर्जे, रावसाहेब मडके, पवन साळवे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी हर्षदा काकडे म्हणाल्या, आलटून पालटून तीनही घराण्यांना मतदारांनी सत्ता दिली. साखर कारखाने दिले. मात्र त्यांनी जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. जनतेने ठरवले, तर भल्याभल्यांची जनता जिरवते, हे लोकसभा निवडणुकीच्या वेळी सिध्द झाले.
याची पुनरावृत्ती तालुक्यात घडणार आहे. ज्यांना जनहित कळत नाही, त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे सांगून आता काहीही झाले तरी थांबायचे नाही. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी आणण्यासाठी निवडणूक लढण्याचा वज्रनिर्धार यावेळी काकडे यांनी केला.
तालुक्यातील लढवय्या शेतकऱ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे एमआयडीसी संदर्भात मागणी केली. त्यांनीही तत्काळ दखल घेऊन बैठका घेतल्या.
मात्र, मंजुरीच्या वेळी या प्रश्नात अनेकांनी खोडा घालून सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या स्वप्नाचा चुराडा केला, अशी टीका ऍड.शिवाजीराव काकडे यांनी केली.