Ahilyanagar news : बुधवारी मतदानादरम्यान शिरसाटवाडी येथील मतदान केंद्राला भाजपाच्या उमेदवार मोनिकाताई राजळे भेट देण्यासाठी आल्या असता त्यावेळी मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या आतमध्ये येवून २० ते २५ अनोळखी व्यक्तींनी हुल्लडबाजी केली.

गोंधळ घालून जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी मतदान केंद्राध्यक्ष गोरक्ष बोडखे यांच्या फिर्यादीरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मतदानावेळी घडलेल्या घटनेचा गुन्हा दुसऱ्या दिवशी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिरसाटवाडी येथील मतदान केंद्राध्यक्ष गोरक्ष बोडखे यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, आम्ही सर्व मतदान अधिकारी व कर्मचारी, होमगार्ड असे मतदान केंद्रावर होतो. सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास भाजपाच्या उमेदवार आमदार मोनिकाताई राजळे शिरसाटवाडी येथील मतदान केंद्रावर भेट देण्यासाठी आल्या होत्या.

त्या आमच्या मतदान केंद्राला भेट देवून शेजारच्या जिल्हा परीषदेच्या मोकळ्या असलेल्या खोलीमधे जात असताना अनोळखी २० ते २५ व्यक्ती तेथे मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आतमध्ये आले. त्यांनी हुलल्डबाजी व गोंधळ करत त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. तसेच युवक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांनी राजळे यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली.

पोलिसांनी तरुणांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस दल अपुरे असल्याने काही परिणाम झाला नाही. यानंतर राजळे यांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. दगडफेक सुरू असतानाच राजळे यांना कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राच्या खोलीत नेले. या वेळी सुमारे एक तास वीज गायब झाली होती, त्यामुळे त्यांना काही काळ अंधारात बसावे लागले.

उपविभागीय अधिकारी सुनील पाटील व पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे शिरसाठवाडी येथे पोलिस बंदोबस्त घेऊन आले.
या दरम्यान त्यावेळी आमची मतदान प्रक्रिया सुरळीत होती.

मतदानाची वेळ संपल्यानंतर आम्ही ईव्हीएम मशीन घेवुन बसकडे आलो, तरीही तेथील २० ते २५ जणांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लघन केले. त्यामुळे त्यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक महादेव गुट्टे करीत आहेत.