Ahilyanagar News : जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थस्थळ असलेल्या शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जिल्हा, राज्य, देश,तसेच विदेशातील देखील साईभक्तांची मोठी रेलचेल असते . त्यामुळे दर्शनासाठी आलेले साईभक्त आपापल्या परीने साईंच्या तिजोरीत सोने, चांदी, हिरे, नाणी, पैसे, वस्तू स्वरुपात दान करतात.

गत आर्थिक वर्षात साई संस्थानला विविध मार्गाने ८१९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, संस्थानची एकूण गुंतवणूक ही २९१६ कोटीवर पोहचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही गुंतवणूक ४१९ कोटींची वाढल्याचे चित्र आहे.

दिवसेंदिवस शिर्डीत भाविकांची गर्दी वाढत आहे. साई दर्शनासाठी दररोज ५० हजारांहून अधिक साईभक्त शिर्डीत हजेरी लावतात. संस्थानच्या माध्यमातून या साईभक्तांना चहा, पाणी, भोजन प्रसाद, लाडू प्रसाद, निवास व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांची संख्या वाढती आहे.

यातून स्थानिक अर्थकारण फिरतेच, शिवाय संस्थानच्या उत्त्पन्नातही मोठी भर पडत आहे. साई संस्थानच्या लेखापरीक्षण अहवालानुसार, दि. ३१ मार्च २०२४ अखेर संस्थानच्या राष्ट्रीयकृत बँकेत ठेवी स्वरुपात २९१६ कोटींची रक्कम गुंतवणूक केलेली आहे. तर एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या आर्थिक वर्षात साईच्या दक्षिणा पेटीत १७६ कोटींचे दान साईभक्तांनी टाकले आहे.

सर्वसाधारण देणगी १२१ कोटींची प्राप्त झाली आहे. सोने, चांदी व मौलवान खडे ११ कोटींचे दान साई तिजोरीत मिळाले आहे. अन्नदान निधी म्हणून ९६ कोटी, रुग्णालयासाठी ५४ कोटी, प्रसादालयासाठी ४६ कोटी, इमारत देखभाल दुरुस्तीसाठी ३२ कोटी, वस्तु स्वरुपात ८ कोटी, इतर असे एकूण ८१९ कोटी रुपयांचे उत्पन्न साई संस्थानला मिळाले आहे. यामध्ये २९१६ कोटींच्या गुंतवणुकीवरील २०० कोटींच्या व्याजाचाही समावेश आहे.

एकूण, साईभक्तांच्या दातृत्वामुळे वेगवेगळ्या सोयीसुविधा पुरवणे शक्य होत आहे. येणाऱ्या काळात आणखी सुविधा पुरविण्यावर संस्थान भर देणार असल्याचे चित्र आहे.

साईभक्तांच्या सोयीसुविधांसाठीच्या कामांकरीता शिर्डी नगरपरिषदेला साईच्या उत्पन्नातून काही रक्कम देण्यात आलेली आहे. तसेच नियोजित शैक्षणिक संकुल प्रकल्पातील इमारतीचे फर्निचर वर्कचे काम प्रगतीपथावर आहे.

संस्थान मालकीचे २४ प्लॉट आहेत. त्यांना संरक्षक कंपाऊंड केले जात आहे. संस्थान कर्मचाऱ्यांसाठी वाहन पार्किंग उभारली जात आहे. लाडू व बुंदी प्रोसेसिंगचे २० कोटींचे युनीट उभारले जाणार आहे. नवीन भांडार इमारतीसाठी ११ कोटी मंजूर झाले आहेत.

लेखाशाखा विभागाचे स्टॉशरुम बांधली जाणार आहे, जलवाहिनी, काही इमारती व कॅन्टीनचे नूतनीकरण, लॉन्ड्री युनिट उभारणी, साईनाथ रुग्णालयासाठी केसपेपर इमारत उभारणे, यासह १६ प्रकल्प प्रस्तावित आहे. आतापर्यंत्त साईभक्तांसाठी सेवेसाठी एकूण उत्पन्नातून संस्थानने ४८९ कोटींचा खर्च केल्याचे अहवालातून पुढे आले आहे.