Ahilyanagar News : सध्या जिल्ह्यात खून, दरोडे, जातीवाचक शिवीगाळ, मारहाण या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे.

नुकतेच नगर तालुक्यातील खांडके या गावात एका तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करून लाकडी दांडके, लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी करण्यात आले. गौतम रामदास ठोंबे (वय २९ ) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून उपचारादरम्यान त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून सात जणांविरूध्द अट्रॉसिटी व अन्य कलमान्वये नगर तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समीर शौकत देशमुख, बाबा रहमान शेख, रियाज निसार शेख, किरण यमाजी चेमटे, चेअरमन बाळू चेमटे, बंटी बाळू चेमटे, सोमा चिमटे (सर्व रा. खांडके) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शुक्रवारी (२७ डिसेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास खांडके शिवारात राजेंद्र महादेव ठोंबे यांच्या घरी ही घटना घडली.

शुक्रवारी रात्री गौतम हे चुलते राजेंद्र यांच्या घरी असताना संशयित आरोपी तेथे आले. त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करत घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.

गौतम व अनिकेत ठोंबे यांना घराच्या बाहेर ओढून मारहाण केली. संशयित आरोपींनी गौतम यांना लाकडी दांडके, लोखंडी रॉड व करून जखमी केले. अनिकेत यांनाही मारहाण केली. जातीवाचक शिवीगाळ करून माझ्याकडे तलवार आहे यांना कापून मारून टाकू, असे म्हणून घरासमोरील दोन दुचाकींचे नुकसान केले आहे.

लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपत भोसले व नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.