Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीत सत्तेची समीकरणे जुळवण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जाची आता रँडम पद्धतीने छाननी सुरू झाली आहे.
या छाननीत कागदपत्रांत तीन ते चार टक्के त्रुटी असण्याची शक्यता प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी हिरमुसल्या आहेत.
निवडणुकीत लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडत, मतदानाचा हक्क बजावला. परिणामी, २०१९ च्या तुलनेत यंदा महिला मतदानाच्या टक्केवारीत घसघशीत वाढ झाली. त्यामुळे यंदा निवडून आलेल्या आमदारांच्या विजयात लाडक्या बहिणींचा वाटा मोठा असल्याचे दिसून आले.
दरम्यान लाडक्या बहिणींनी अर्ज भरताना कागदपत्रांत चुकीचा आधार क्रमांक, पुसट प्रत, स्वाक्षरी न जुळणे, अर्जदार यंदा खा एक-आधार दुसऱ्याचे, अशा काही मानवी त्रुटी असू शकतात, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. त्यानुसार महिला व बालकल्याण विभागाकडून ही छाननी केली जात आहे.
विषेश म्हणजे, सरकारने पडताळणीचे आदेश दिलेले नसले तरी, कोणत्याही शासकीय योजनेत छाननीची ही नियमित प्रक्रिया असल्याचे अधिकारी सांगतात.
आचारसंहिता लागू होण्याच्या दिवसापर्यंत नाशिक विभागातून तब्बल ४८ लाख ३० हजार १४४ अर्ज दाखल झाले होते. यातील किरकोळ अपवाद वगळता सर्वच महिला लाभार्थी ठरल्या आहेत.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही योजना आल्यामुळे प्रभावी अंमलबजावणीसाठी राजकीय दबाव होता.
तेव्हा यंत्रणेने अक्षरशः रात्रंदिवस काम केले. घाईघाईत लाखो अर्ज, कागदपत्रे सादर झाली. कोणत्याही शासकीय योजनेत साधारपणे एक टक्का प्रमाणात अर्जाची छाननी केली जाते.
शेतकरी सन्मान योजनेतील अर्जाच्या अशा छाननीत पाच टक्के लाभार्थी कमी झाल्याचे उदाहरण अधिकाऱ्यांनी दिले आहे. मात्र आता आपला अर्ज बाद झाला तर या गोष्टीचे अनेकांनी टेन्शन घेतले आहे. सरकारकडून मात्र याबाबत कोणतीही अधिक प्रतिक्रिया देण्यात आली नाही.